विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अखेर निर्भयाला न्याय मिळाला… पण कधी आणि कसा? निर्भयाच्या आईच्या डोळ्यातले अश्रू बरेच काही सांगून गेले. त्या अश्रूंनी सांगितले, तू या देशात काहीही हो, कोणीही हो…पण एखाद्या अन्यायग्रस्ताची आई होऊ नकोस… अन्यायग्रस्तासाठी न्याय मागू नकोस… कारण तुला या देशात मिळतील अपमानाचे धोंडे आणि मानवतावादाच्या उपदेशाचे डोस… हा मानवतावाद उभा राहील तो अन्याय करणार्या गुन्हेगारांच्या बाजूने… मानवी हक्कांचे ढोल आपला ऊर फुटेस्तोवर बडवले जातील गुन्हेगारांच्या समर्थनासाठी आणि अन्यायग्रस्तांच्या आईला मिळतील फक्त उपदेशाचे डोस… बाई, गुन्हेगारांना माफ कर…!! कारण देशात फक्त गुन्हेगारच ठरलेत मानवी हक्कांचे हक्कदार आणि ठेकेदार. निर्भयाच्या केसने गेल्या आठ वर्षांमध्ये न्यायाचे, न्यायव्यवस्थेचे असे धिंडवडे पाहिले. अन्यायग्रस्तांसाठी कोर्टाची एकच अत्यंत अवघड वाट पण गुन्हेगारांसाठी कायद्याच्या असंख्य पळवाटा पाहिल्या.
गुन्हेगारांच्या साठी चार वेळा निघालेले डेथ वॉरंटची भेंडोळी निघालेला हा एकमेव खटलाही पाहिला… निर्भयाचे चारही गुन्हेगार फासावर लटकले… हो लटकवले… त्यांचे प्राण गेले
… पण त्यांनी निर्माण केलेले आणि त्यांच्या मानवी हक्कांसाठी जीवाचा आटापिटा करणार्यांनी निर्माण केलेले प्रश्न अजून जिवंत आहेत. तुम्ही या देशात खून करा, बलात्कार करा, बाँबस्फोट करा, तुमच्या मानवी हक्कांसाठी इथली एक जमात सदैव उभी राहील. तुमच्यासाठी कायद्याच्या असंख्य पळवाटा शोधेल. नसतील तर आणखी पळवाटा तयार करून देतील. तुमच्यासाठी न्यायालयाचे दरवाजे मध्यरात्री देखील उघडले जातील, पण… अन्यायग्रस्ताची मात्र येथे पुरती फरफट होईल. हे असे का? हे केव्हा थांबणार? देशातल्या १३० कोटी जनतेला या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत….. ती कोण देणार, हा प्रश्न आहे.