भारताच्या मैत्रीपुर्ण संंबंधांवर सातत्याने पाणी ओतणाऱ्या पाकिस्तानला यंदाच्या ईदला भारताने चांगलाच धडा शिकवला आहे. भारत-पाकिस्तानात कितीही तणावाचे प्रसंग आले तरी बाघा बॉर्डरवर दररोज परेड होते. सीमा सुरक्षा दलाचे जवान आणि पाकिस्तानी रेंजर्स यांच्यात सण-समारंभानिमित्त मिठाईची देवाणघेवाण होते. मात्र, कोरोनाच्या संकटात मदत केल्यानंतरही पाकिस्तपुरस्कृत दहशतवाद थांबलेला नाही. त्यामुळे यंदा सीमा सुरक्षा दलाने रमजान निमित्त सीमेवरील पाक सैनिकांना मिठाई दिली नाही.
वृत्तसंस्था
अमृतसर : भारत-पाकिस्तानमध्ये तणावाचे प्रसंग आले तरी बाघा बॉर्डरवर दररोज परेड होते. सीमा सुरक्षा दलाचे जवान आणि पाकिस्तानी रेंजर्स यांच्यात सण-समारंभानिमित्त मिठाईची देवाणघेवाण होते. मात्र, दहशतवादी कारवाया थांबविण्यास तयार नसल्याने यंदाच्या सीमा सुरक्षा दलाने रमजान निमित्त मिठाई दिली नाही.
भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांकडून मिठाईची देवाणेघेवाण करण्याची पद्धत आहे. पण यावेळी सीमा सुरक्षा दल आणि पाकिस्तानी रेंजर्समध्ये मिठाईची देवाणघेवाण झाली नाही. याचे कारण चीनी व्हायरसचा प्रादुर्भाव नसून पाकिस्तानकडून सातत्याने केली जाणारी आगळिक आहे. पाकिस्तानचे सैनिक सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहेत. त्याचबरोबर दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देत आहेत.महा
मारीच्या संकटाच्या काळातही पाकिस्तानकडून काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांना पाठबळ दिले जात आहे. हंदवाडा येथे दहशतवाद्यांनी पाच अधिकारी आणि जवानांची हत्या केली. त्याचबरोबर याच काळात तीनशेहून अधिक दहशतवाद्यांना काश्मीर खोऱ्यात घुसविण्याचा प्रयत्न केला होता. भारतीय लष्कराने हा प्रयत्न हाणून पाडला.
बांगलादेश सीमेवर मात्र परंपरेप्रमाणे मिठाईची देवाणघेवाण करण्यात आली. स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, दिवाळी किंवा महत्त्वाच्या दिवशी दोन्ही सीमा दलाकडून मिठाईची देवाणघेवाण करण्याची प्रथा आहे.