- प्रकाश आंबेडकर यांची मागणी
विशेष प्रतिनिधी
मुंबई : नरेंद्र मोदींमुळेच कोरोना भारतात आला, त्यांच्यावर 302 चा गुन्हा दाखल करा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
परदेशातून येणाऱ्या लोकांना वेळीच क्वारंटाईन न केल्याने देशात कोरोनाचा प्रसार झाला. यासाठी फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच जबाबदार आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांच्या नातेवाईकांनी पंतप्रधान मोदींवर 302 चा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आंबेडकर यांनी केली आहे.
“कोरोनाचा जगात प्रादुर्भाव झाल्यानंतर जानेवारीपासूनच लॉकडाऊनची प्रक्रिया सुरू झाली. मात्र, भारतात मार्चचा तिसरा आठवडा उजाडल्यानंतर परदेशातून येणाऱ्या लोकांची तपासणी सुरु झाली. त्यांना वेळीच 14 दिवस क्वारंटाईन केले असते तर भारतात कोरोना पसरला नसता, असा आंबेडकरांचा दावा आहे.
देशातल्या स्थलांतरित मजुरांनाही लॉकडाऊन करण्यापूर्वी त्यांच्या राज्यात पाठवून दिले असते तर आज मजुरांवर उपासमारीची वेळ आली नसती, असे आंबेडकरांनी म्हटले. कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून ते सुधारण्याच्या स्थितीमध्ये सरकार दिसत नाही. येत्या काळात संकटांवर, संकटे येणार असून त्यामुळे श्रीमंत आणखी श्रीमंत होत जातील, गरीब आणखी गरीब होत जातील, असा दावा आंबेडकर यांनी केला.