देशातील इतर राज्यांत कामगारांच्या स्थलांतरामुळे राज्यांच्या पोटात गोळा आला आहे. ममता बँनर्जी यांच्या सारखे काही मुख्यमंत्री तर आपल्याच राज्यातल्या मजुरांना स्विकारण्यास तयार नाही. परंतु, उत्तर प्रदेशात सर्वाधिक कामगार परतले असूनही योगी आदित्यनाथ यांचे सरकार डगमगलेले नाही.
वृत्तसंस्था
लखनऊ : देशातील इतर राज्यांत कामगारांच्या स्थलांतरामुळे राज्यांच्या पोटात गोळा आला आहे. परंतु, उत्तर प्रदेशात सर्वाधिक कामगार परत आले असूनही योगी आदित्यनाथ यांचे सरकार डगमगलेले नाही. उलट त्यांचा उपयोग करून घेऊन उत्तर प्रदेशचा मेक ओव्हर करण्याची तयारी सुरू केली आहे.
गेल्या ५ दिवसांमध्ये बस, ट्रेन, पायी किंवा इतर साधनांचा वापर करत तब्बल ४ लाख स्थलांतरित मजूर उत्तर प्रदेशात दाखल झाले आहेत. या मजुरांपैकी एकूण १ लाख मजूर हे फक्त सोमवारी दाखल झाले आहेत. उत्तर प्रदेश सरकारने स्थलांतरितावर लक्ष ठेवण्यासाठी आपली यंत्रणा सक्षम केली असून या यंत्रणेद्वारे उत्तर प्रदेशात येणार्या स्थलांतरितांची खडानखडा माहिती प्रशासनाला देण्यात येणार आहे.
देशातील विविध राज्यांमधून उत्तर प्रदेशात आलेले स्थलांतरित क्वारंटीनचे नियम व्यवस्थित पाळतात की नाही, यावर देखील ही यंत्रणा नजर ठेवून असणार आहे.
या यंत्रणेत नेहरू युवा केंद्र, युवक मंगल दल, चौकीदार, आशा वर्कर्सच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात येत आहे. येत्या काही दिवसांमध्ये उत्तर प्रदेशात लाखो स्थलांतरित येणार असून स्थलांतरितांनी होम क्वारंटीनचे नियम पाळले नाहीत, तर उत्तर प्रदेशातील करोनाबाधितांची संख्या वाढण्याची शक्यता निर्माण होईल. हे लक्षात घेता सामाजिक स्तरावर करडी नजर ठेवणे हे आमचे सर्वात प्रभावी हत्यार ठरेल, असे एका शासकीय अधिकार्याने सांगितले.
सोमवार पर्यंत एकूण १८४ ट्रेनद्वारे एकूण २ लाख २० हजार ६४० स्थलांतरित उत्तर प्रदेशात आले. तसेच सोमवारी रात्रीपर्यंत आणखी ७१ अतिरिक्त ट्रेनद्वारे सुमारे ७० हजार स्थलांतरित उत्तर प्रदेशात दाखल होतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.