ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी दानशुरतेचा नवा आदर्श घालून दिला आहे. पुणे जिल्ह्यातील पौडजवळील नाणे गावातील एक एकराचा प्लॉट अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला दान करण्याचे ठरविले आहे. ज्येष्ठ कलावंतासाठी मोफत राहण्याची सोय याठिकाणी होणार आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी दानशुरतेचा नवा आदर्श घालून दिला आहे. पुणे जिल्ह्यातील पौडजवळील नाणे गावातील एक एकराचा प्लॉट अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला दान करण्याचे ठरविले आहे. ज्येष्ठ कलावंतासाठी मोफत राहण्याची सोय याठिकाणी होणार आहे.
ज्येष्ठ कलावंतांची उतारवयात फरफट होते. त्यासाठी काहीतरी उपाय शोधावा यासाठी विक्रम गोखले यांचे प्रयत्न होते. त्यामुळे त्यांनी यावेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला पाठिंबा देत ही जबाबदारी पूर्ण करण्याचा मानस व्यक्त केला आहे. यासाठी त्यांनी नाणे गावातील पौड जवळील स्वमालकीचा एक एकराचा प्लॉट महामंडळाच्या नावाने करून द्यायचा ठरवला आहे. आज त्याची बाजारभावानुसार किंमत ही 2.5 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
या ठिकाणी महामंडळाने ज्येष्ठ व एकटे राहणाऱ्या कलावंताना आसरा आणि सहारा मिळावा यासाठी निवारा उभारण्याचे ठरविले आहे.
विक्रम गोखले यांच्या घरातच दानशुरतेचा वारसा आहे. त्यांचे वडील ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत गोखले दरवर्षी देशाप्रती आपली कृतज्ञता भाव व्यक्त करण्याकरिता आपल्या कमाईतील काही भाग नित्यनेमाने भारतीय सैन्यदलाला मदत म्हणून देत असत.
अखिल भारतीय मराठी चित्रपटाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी विक्रम गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली हा आश्रम उभा करण्याचे ठरवले असून त्यांनी विक्रम गोखले यांचे आभार मानले आहेत.