विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तू, जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत नसलेल्या अन्य सर्व वस्तू विशेषत: वैयक्तिक स्वच्छता, अन्य सफाईच्या वस्तू यांचा तुटवडा जाणवू नये, यासाठी या सर्वांची वाहतूक खुली करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने सायंकाळी घेतला. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी राज्यांच्या मुख्य सचिवांना या निर्णयाची माहिती देणारे आणि अंमलबजावणीची सूचना देणारे पत्र पाठविले आहे. यात किराणा माल, हँडवॉश, साबण, सँनिटायझर्स, टुथपेस्ट व अन्य स्वच्छता, सफाईच्या वस्तू, बँटरी सेल, चार्जर या वस्तूंची वाहतूक तसेच दूधाचे संकलन, वितरण यांच्यासाठी चालणारी सर्व वाहतूक खुली करण्यासंबंधीच्या सूचना आहेत. लॉकडाऊनला आज सहा दिवस झाले आहेत. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक खुली होतीच परंतु, त्यासह सर्वच वस्तूंचा पुरवठा या पुढील काळात विस्कळित होऊन लोक पुन्हा या वस्तूंच्या खरेदीसाठी रस्त्यांवर आणि दुकानांमध्ये गर्दी करू नयेत, या हेतूने वरील निर्णय घेण्यात आला आहे. वृत्तपत्रे, नियतकालिकांच्या वाहतुकीचाही यात समावेश करण्यात आला आहे. देशभरात सहा दिवसांसाठी वृत्तपत्रे वितरण बंद राहणे, ही अभूतपूर्व घटना होती. उद्याची सायं दैनिके आणि परवा सकाळपासून वृत्तपत्रांचे नियमित वितरण सुरू होऊ शकेल. त्याच बरोबर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या नियंत्रणाखाली भारतीय रेडक्रॉस सोसायटीच्या सेवांची वाहतूकही खुली करण्यात आली आहे. केंद्रीय गृह सचिवांचे पत्र जारी होण्यापूर्वी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी एक उच्चस्तरीय बैठक झाली. त्यात राजनाथ सिंह यांच्या बरोबर गृहमंत्री अमित शहा, आरोग्यमंत्री हर्षवर्धन, माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर, धर्मेंद्र प्रधान आदी मंत्री आणि वरिष्ठ सचिव उपस्थित होते. बैठकीत देशातील स्थितीचा व्यापक आढावा घेण्यात आला. नंतर वाहतूक खुली करण्यात आल्याचा निर्णय जारी करण्यात आला.