- “देश करोनाशी लढा देतोय आणि आपले गृहमंत्री CAA विरोधातील आंदोलकांना अटक करताहेत”
- जावेद अख्तर यांचे कळवळून ट्विट
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : प्रख्यात गीतकार, संवाद लेखक, लिबरल विचारवंत जावेद अख्तर अखेर मूळ पदावर आले आणि शाहीनबागींची आरती गायला लागले. “एकीकडे देश करोना संकटाशी लढा देतोय आणि दुसरीकडे आपले गृह मंत्रालय सीएएविरोधी आंदोलन केलेल्यांना अटक करण्यात व्यस्त आहे,” अशा शब्दांत जावेद अख्तर यांनी टीका केली आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी गृह मंत्रालयावर ताशेरे ओढले आहेत.
काही वेळापूर्वीच अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक हैदराबादमध्ये मुस्लीम परिवारांना धान्य वाटप करत असल्याचे फोटो सोशल मीडियावर without caption शेअर केले होते. त्यावर आरएसएस प्रेमींनी संघाच्या मदतीवर जावेद अख्तर “नि:शब्द” झाल्याच्या बातम्या शेअर केल्या होत्या. त्यांना जावेद अख्तर यांनी आपल्या मूळ पदावर येऊन “आहेर” दिला आहे.
‘आपला देश करोना आणि स्थलांतरित मजुरांचा प्रश्न, बेरोजगारी, गरिबी या करोनापासून निर्माण झालेल्या समस्यांशी झुंज देत असताना आपले गृह मंत्रालय CAA विरोधात (सुधारित नागरिकत्व कायदा) आंदोलन करणाऱ्यांना अटक करण्यात व्यस्त आहे. त्यांचा प्राधान्यक्रम उर्वरित भारतापेक्षा वेगळा आहे’, अशी बौद्धिक टीका जावेद अख्तर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केली.
याआधी गायक विशाल दादलानीनेही अमित शाह यांच्यावर निशाणा साधला होता. तबलिगी मरकज प्रकरण असो किंवा मग वांद्रे येथील गर्दीचे प्रकरण असतो, करोना व्हायरसचे मोठे संकट देशासमोर असताना गृहमंत्री अमित शाह अजूनही शांत का आहेत, असा सवाल त्याने उपस्थित केला होता.