चिनी विषाणूच्या साथीचा आजार देशात आल्यापासून कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. चिनी विषाणुचा पहिला रुग्ण आढळल्याच्या घटनेला एक महिना होऊन गेल्यानंतरही 130 कोटी लोकसंख्येच्या भारतातली कोरोनाग्रस्तांची संख्या जेमतेम 21 हजारांच्या घरात आहे. या कामगिरीचे कौतुक साऱ्या जगाला आहे. पण सोनिया गांधींनी मोदींवर उखडण्याचे राजकीय टायमिंग आताच का साधले, याबद्दल प्रश्न निर्माण झाला आहे.
खास प्रतिनिधी
नवी दिल्ली : चिनी विषाणूचा देशातील प्रसार आणि गती या दोन्हीमध्ये गेल्या तीन आठवड्यात चिंताजनक वाढ झाली आहे. या जागतिक साथीच्या आजारांवरील लॉकडाऊनचा परिणाम कमी करण्यात मोदी सरकार देशवासियांच्या प्रती पुरेशी करुणा आणि ममत्व दाखवू शकलेले नाही, अशी जोरदार टीका कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे.
भारतातील चिनी विषाणूच्या साथीचा आजार मर्यादीत ठेवल्याबद्दल संपूर्ण जगातून कौतुक होत असताना गांधी यांनी टीका करण्याचे टायमिंग साधल्यावरुन याकडे राजकीय चष्म्यातून पाहिले जाऊ लागले आहे. चिनी विषाणूचे संकट आल्यापासून सोनिया गांधी यांनी पहिल्यांदाच टीका केली आहे. सत्ताधारी पक्षाने पसरवलेल्या “जातीय द्वेषाचा विषाणू”वरही प्रत्येकाने चिंता व्यक्त करावी, असे गांधी म्हणाल्या.
“मलाही तुमच्याबरोबर असे काहीतरी सामुदायिक करावयाचे आहे, ज्याबद्दल आपण प्रत्येकाने चिंता करावी. आपल्यापैकी प्रत्येकजण कोरोना विषाणूचा एकत्रितपणे सामना करीत असताना, भाजपामात्र जातीय पूर्वग्रह आणि द्वेषाचा विषाणू पसरवत आहे. आमच्या सामाजिक समरसतेचे यातून गंभीर नुकसान झाले आहे. हे नुकसान भरुन काढण्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतील,” असं सोनिया गांधी म्हणाल्या.
कॉंग्रेसच्या अध्यक्षांनी सांगितले की त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनेकदा पत्र लिहिले, कोरोनव्हायरस लढ्यात विधायक सहकार्याची ऑफर दिली. ग्रामीण व शहरी लोकांचे दुःख दूर करण्यासाठी त्यांनी सूचना केल्या. “दुर्दैवाने या सगळ्याला मोदी सरकारकडून केवळ अर्धवट आणि चुकीच्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला. केंद्र सरकारच्या वागण्यात करुणा, मनाची लवचिकता आणि उमदेपणा यांचा अभाव आणि लवचिकता स्पष्ट दिसत आहे,” असा आरोप गांधी यांनी केला.
कोरोनाव्हायरस लॉकडाऊन सुरू असतानाही शेतकरी, शेत मजूर, स्थलांतरित कामगार, बांधकाम कामगार आणि असंघटित क्षेत्रातील कामगार यांना अजूनही तीव्र त्रास सहन करावा लागतो आहे. व्यापार आणि उद्योग ठप्प झाल्याने कोट्यवधींची रोजीरोटी नष्ट झाली आहे, अशी टीका गांधी यांनी केली. येत्या मे महिन्यानंतर परिस्थिती पुन्हा पुर्ववत कशी होईल याविषयी केंद्र सरकारला स्पष्ट कल्पना दिसत नाही. लॉकडाऊन उठल्यानंतरचे स्वरूप आणखी विनाशकारी असू शकेल, असे गांधी यांनी म्हटले आहे.