देशात २२ हजार ४५५ रुग्ण कोरोनामुक्त, २४ तासात वाढले ३,६०४ नवे रुग्ण
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : संपूर्ण जगाचा विचार करता भारतात मृत्यूदर सर्वांत कमी म्हणजे ३.२ टक्के आहे, तर रुग्ण बरे होण्याचा दर आता ३१.७४ टक्के एवढा झाला आहे. त्याचप्रमाणे रुग्ण दुप्पटीकरणाचा दरदेखील आता १०.९ दिवसांवरून १२.२ दिवसांवर आला आहे. त्यामुळे भारत कोरोना संकटाचा यशस्वीपणे सामना करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी मंगळवारी व्यक्त केला.
केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी जम्मू – काश्मीर व लडाख हे केंद्रशासित प्रदेश आणि उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या राज्यांच्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
संपूर्ण जगाचा विचार करता भारतात मृत्यूदर सर्वांत कमी असून ही अतिशय सकारात्मक बाब असल्याचे डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले. सध्या संपूर्ण जग कोरोना संकटाचा सामना करीत आहे, भारतात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर हा ३.२ टक्के आहे, तर जगाचा मृत्यूदर सात ते साडेसात टक्क्यांच्या दरम्यान आहे. त्यामुळे भारतात जगाच्या तुलनेत चांगली परिस्थिती असल्याचे सिद्ध झाले आहे.
त्याचप्रमाणे गेल्या १४ दिवसात रुग्णसंख्या दुप्पटाचा दर हा १०.९ दिवस होता, त्यातही आता सुधारणा झाली असून आता १२.२ असा दुप्पटीचा दर झाला आहे. यामुळेही मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या देशातील उपचार घेत असलेल्या एकुण रुग्णांपैकी २.३७ टक्के रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत, ०.४१ टक्के रुग्णांना जीवरक्षक प्रणालीवर (व्हेंटीलेटर) ठेवण्यात आले आले आहे तर १.८२ रुग्णांना ऑक्सिजन सपोर्ट देण्यात आला आहे.
कोरोना चाचणी करण्याची क्षमता वाढविण्यात आता यश आले असून सध्या दररोज जवळपास १ लाख चाचण्या केल्या जात आहेत. त्यासाठी ३४७ सरकारी तर १३२ खासगी प्रयोगशाळा कार्यरत आहेत. आतापर्यंत १७ लाख, ६२ हजार ८४० चाचण्या करण्यात आल्या असून सोमवारी एका दिवसात ८६ हजार १९१ नमुन्यांची तपासणी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे चाचण्यांविषयी कोणत्याही प्रकारची अडचण देशात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्य सरकारे केंद्र सरकारसोबत दाखवित असलेल्या समन्वयाचा विशेष उल्लेख केला. राज्य सरकारे कोरोनाविरोधातील लढ्यासाठी अतिशय़ सकरात्मक भूमिका पार पाडत आहेत. केंद्र व राज्यांच्या संयुक्त प्रयत्नांनी देशात कोव्हिड विशेष इस्पितळे, विलगीकरण कक्ष, अतितक्षता विभाग यांची पुरेश सुविधा उपलब्ध करण्यात यश आले आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीचा सामना करण्यास देश तयार असल्याचा विश्वासही डॉ. हर्षवर्धन यांनी यावेळी व्यक्त केला.
२२ हजार ४५५ रुग्ण कोरोनामुक्त
देशात आतापर्यंत एकुण २२ हजार ४५५ रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी आता ३१.७४ झाली असून त्यात दररोज वाढ होताना दिसत आहे. गेल्या २४ तासात एकुण १ हजार ५३८ रुग्ण बरे झाले, ३ हजार ६०४ नवे रुग्ण आढळून आले आहेत आणि ८७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनारुग्णांची एकुण संख्या ७० हजार ७५६ झाली असून त्यापैकी ४६ हजार ००८ रुग्ण सक्रिय आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती डॉ. हर्षवर्धन यांनी यावेळी दिली.