- “गॅल्वान व्हॅलीवर चीनचा दावा; भारतही मागे हटणार नाही
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली / बीजिंग : लडाखमधील संघर्षात भारताकडून लष्करी आणि राजनैतिक पातळीवर कडक प्रत्युत्तर मिळत असतानाही चीनची हेकडी काही अजून जात नाही. चीनने गँल्वान व्हँलीवर दावा सांगितला आहे. भारताने तो फेटाळून लावला आहे.
चीन अजूनही १९६२ च्या काळात वावरत असून ग्लोबल टाइम्सच्या माध्यमातून चीनी सरकारने त्या युद्धाची आठवण करून दिली आहे. भारताची दुखती नस दाबली की भारत “वळणावर” येईल, अशी चीनी कम्युनिस्ट राजवटीची धारणा आहे. पण भारताने या धमकीनंतरही आपली नवी भूमिका तसूभरही न बदलता लडाखमधील संघर्षाचा यशस्वी मुकाबला चालू ठेवलाय. चीनला नेमके हेच डाचतयं.
एककीडे जगभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे तर दुसरीकडे चीनच्या कुरापतींमुळे सीमेवरही तणाव वाढत आहे. सध्या चीनने लडाखमधील सीमेवर लष्कराच्या हालचाली मोठ्या प्रमाणात वाढवल्या आहेत. चीनच्या लष्कराने गॅल्वान व्हॅलीमध्ये आपले तंबू उभारले आहेत. तर दुसरीकडे पँगाँग सरोवरानजीकही चीनच्या सैन्याने गस्त वाढवली आहे. या परिस्थितीत तणावाला भारतच जबाबदार असल्याच्या “चोराच्या उलट्या *” चीनने ठोकल्या आहेत.
गॅल्वान व्हॅली हा चीनचाच एक भाग आणि भारत जाणूनबुजून वाद निर्माण करत आहे. भारताने गॅल्वान व्हॅलीमध्ये अवैधरित्या लष्करी सोयीसुविधा निर्माण केल्या आहेत. यामुळे चीनकडे भारताला प्रत्युत्तर देण्याशिवाय कोणताही पर्याय नाही. यामुळे दोन्ही पक्षांमध्ये सीमा वाद अधिक वाढण्याची शक्यता आहे, असे चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सच्या संपादकीयमध्ये नमूद करण्यात आले आहे.
१९६२ ची करून दिली आठवण
अमेरिकेसोबत चीनचे संबंध सध्या उत्तम नसले तरी चीनची आंतरराष्ट्रीय स्थिती ही १९६२ पेक्षा उत्तम आहे. त्यावेळी भारताचा चीनने पराभव केला होता. तेव्हा दोन्ही देशांची ताकद एकसारखीच होती. परंतु आता चीनचा जीडीपी हा भारताच्या तुलनेत पाच पट अधिक आहे. भारतीय सरकार, लष्कर, बुद्धीजीवी आणि माध्यमे चीनबाबत या गोष्टी समजून घेतील, अशी अपेक्षारूपी धमकी ग्लोबल टाईम्सने दिली आहे.
भारतीयांनी गैरसमज बाळगू नये
काही पश्चिमी राष्ट्रांनी चीनला घेरल्यामुळे तसंच करोनाच्या प्रादुर्भावामुळे अर्थव्यवस्थेवर जो परिणाम झाला आहे त्याचा फायदा घेऊन जर सीमेवर भारताला आपली स्थिती बळकट करण्याची संधी मिळाली आहे, असे भारतीयांना वाटत आहे. काही जण अमेरिकेचे समर्थन करत आहेत. परंतु ही त्यांची चुक आहे. यामुळे भारताचे जास्त नुकसान होणार आहे. अमेरिकेसाठी स्वत:चे हितच सर्वात महत्त्वाचे असल्याचे “परोपदेशे पांडित्य” ही ग्लोबल टाइम्सने दाखविले आहे.