सीमेवर चीनच्या कुरापती सुरूच असून लडाख परिसरात प्रत्यक्ष नियंत्रण रेषषवर चीनने मोठ्या प्रमाणावर सैन्याची जमवाजमव केली आहे. तब्बल शंभरहून अधिक तंबू उभारले आहेत. भारतीय लष्करानेही याला उत्तर देण्यासाठी जय्यत तयारी ठेवली आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : सीमेवर चीनच्या कुरापती सुरूच असून लडाख परिसरात प्रत्यक्ष नियंत्रण रेषषवर चीनने मोठ्या प्रमाणावर जमवाजमव केली आहे. तब्बल शंभरहून अधिक तंबू उभारले आहेत. भारतीय लष्करानेही याला उत्तर देण्यासाठी जय्यत तयारी ठेवली आहे.
चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पैंगोग त्सो झील आणि गलवान खोऱ्याच्या आसपास आपल्या सैनिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढविण्यास सुरूवात केली आहे. भारतीय सेनेसोबत सुरू असलेल्या चकमकीपासून चीन मागे हटायला तयार नसल्याचे यातून दिसत आहे. लष्करी तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, गलवान खोऱ्यात मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात केले आहे.
भारतीय लष्कराच्या विरोधानंतरही गेल्या दोन आठवड्यांपासून चीनी सैन्याने शंभरहून अधिक तंबू ठोकले आहेत. त्याचबरोबर बंकर खोदण्यासाठी लागणारी मशीनरीही आणली आहे. या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी लेहमध्ये १४ व्या कोरच्या मुख्यालयाला भेट देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सुरक्षेची पाहणी केली.
लष्करी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय लष्कर चीनला चोख उत्तर देण्यासाठी या भागात आपल्या सैनिकांची संख्या वाढवित आहे. यापूर्वी गेल्या ५ मे रोजी सायंकाळी २५० हून अधिक चीनी सैनिकांनी भारतीय सैनिकांसोबत मारामारी केली होती. यामध्ये दोन्ही बाजूंकडील १०० जवान जखमी झाले होते.