विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : चान्स मिळताच ममता बरसल्या. बंगालचे कोरोना युद्ध उघड्यावर येताच केंद्रावर सरकून मोकळ्या झाल्या… निमित्त होते, पंतप्रधान – मुख्यमंत्री विडिओ कॉन्फरन्सचे. या कॉन्फरन्समध्ये ममतांनी होता नव्हता तो सगळा शाब्दिक, वैचारिक दारूगोळा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांवर पाखडून घेतला. त्यातही त्यांचा रोख अमित शहांवर जास्त होता कारण अमित शहांनी पत्र लिहून ममतांचा सगळा कच्चा चिठ्ठा खोलला होता. सगळीकडून ममतांवर प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली होती.
कोलकात्याचे कोरोनाचे आकडे लपविले. केंद्रीय टीमला राज्य सरकारने सहकार्य केले नाही. कोरोनाचे दैनंदिन रिपोर्टिंग केंद्र सरकारला केले नाही. मजूर, कामगारांनी भरलेल्या श्रमिक एक्सप्रेस अडवून धरल्या.
ही सगळी प्रकरणे मीडियातून expose झाली. ती थेट ममतांवर शेकायला लागली आणि त्यातच अमित शहांनी ममतांना पत्र लिहून केंद्र सरकारला सहकार्य करण्याची विनंती केली. या पत्राने तर अधिकच अडचणीत आल्या. केंद्र सरकारशी पंगा घेण्याची वृत्ती आड आली. ममतांवर बंगालमधूनच प्रश्नांचा भडिमार सुरू झाला. या सगळ्या प्रकारामुळे आधीच चिडखोर असलेल्या ममता आणखीनच भडकल्या आणि त्यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावलेल्या विडिओ कॉन्फरन्समध्ये सगळी भडास काढून घेतली.
मी अमित शहांचा आदर करते. पण अमित शहांनी मला पत्र लिहायचे कारण काय? लिहिले तर ते मीडियाकडे देण्याचे कारण काय? लोक मला विचारायला लागलेत. आम्ही लोकांना काय उत्तरे द्यायची?, असा सवाल ममतांनी मोदींना केला.
आम्ही २४ तास काम करतोय. केंद्रीय टीम कोणतीही पूर्वसूचना न देता येते. राज्याच्या मुख्य सचिवांना आणि आरोग्य सचिवांना विचारणा करते. दौऱ्यात सहभागी व्हायला सांगते. मग त्यांनी त्यांची कामे कधी करायची? मोदीजी तुम्हीही मुख्यमंत्री होतात. निर्णय आधी घेऊन नंतर मुख्यमंत्र्यांच्या बैठका घेतल्या जातात. अशा वेळी आम्ही वागायचे तरी कसे?, असा सवालही ममतांनी केला.
मात्र कोलकत्यातील आकडेवारी लपविल्याबद्दल आणि केंद्र सरकारला करण्यात येणाऱ्या कोरोना रिपोर्टिंगबद्द ममतांनी विडिओ कॉन्फरन्समध्ये एक चकार शब्दही उच्चारला नाही.