उत्तर प्रदेशातील बसच्या राजकारणावरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि हिंदू धर्मावर घाणेरड्या भाषेत ट्विट करणारा कॉँग्रेसचा नेता पंकज पूनिया याला पोलीसांनी अटक केली आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील बसच्या राजकारणावरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि हिंदू धर्मावर घाणेरड्या भाषेत ट्विट करणारा कॉंग्रेसचा नेता पंकज पूनिया याला पोलीसांनी अटक केली आहे.
उत्तर प्रदेशात कॉंग्रेसकडून सुरू असलेल्य बसकांडवरून योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली जात आहे. याच अनुषंगाने पूनिया याने एक ट्विट केले. यामध्ये योगी आदित्यनाथ आणि हिंदू धर्माबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरण्यात आले होते.
या ट्विटवरून प्रचंड गदारोळ उडून पूनियावर संताप व्यक्त करण्यात आला. त्यामुळे त्याने हे ट्विट डिलीट केले. मात्र, देशभरात अनेक ठिकाणी पूनिया याच्याविरुध्द पोलीसांत तक्रार झाली आहे. मनुबन थाना पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदविण्यात आल्यावर पूनियाला अटक करण्यात आली.
पूनिया हा हरियाणा कॉंग्रेस समितीचा माजी प्रदेश सचिव आहे.
पूनियाने केलेल्या ट्विटची भाषा पाहता तो हिंदू आहे का? याबाबतच शंका उपस्थित होते, असे तक्रारदार विजय शर्मा यांनी म्हटले आहे. त्यांनी कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि हरियाणा कॉँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा कुमारी सैलजा यांनाही पत्र पाठवून विचारले आहे की, पूनियाने केलेले ट्विट हे कॉंग्रेसची अधिकृत भूमिका आहे का? पूनियाने या ट्विटमधून आपली घाणेरडी मानसिकता दाखविली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पूनियाने माफी मागितल्यावर त्याला हिंदू धर्मात पुन्हा येण्यासाठी शुध्दीकरण करून घ्यावे लागेल, असेही त्यांनी म्हटले आहे. पूनियाने ट्विटवर एक माफीनामाही लिहून टाकला आहे. त्याचबरोबर ट्विटरवरून हे ट्विट काढूनही घेतले आहे.