विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्ली दंगलीच्या वेळी भडकावणारे भाषण देण्याचा आरोप असलेल्या भाजप नेते कपिल मिश्रांनी दंगा पीडित लोकांसाठी क्राऊड फंडिंगद्वारे आर्थिक मदत केली आहे. मिश्रांनी सोशल मीडियातून दंगा पीडित ४५ कुटुंबांची माहिती शेअर करून त्यांना मदत करण्याची विनंती केली. या पीडितांच्या कुटुंबातील कमावत्या व्यक्ती दंग्यात मारल्या गेल्या आहेत. सोशल मीडियातील या आवाहनानंतर मदतीचा मोठा ओघ सुरू झाला. दिवसभरात ४५ लाख रुपये जमले. लोकांचा हा उत्साह पाहून मिश्रांनी १ कोटी रुपयांच्या मदतीचे टार्गेट ठेवत जागतिक हिंदू फाऊंडेशनला, अनिवासी भारतीयांनाही मदतीचे आवाहन केले आहे. आतापर्यंत १४ हजार लोकांनी ९० लाख रुपयांची मदत केली आहे. त्यालाही भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. यातून मिश्रांचा उत्साह दुणावला आहे. दंगा पीडितांच्या जगण्याच्या आशाही पल्लवित झाल्या आहेत.