विशेष प्रतिनिधी
दिल्ली : अमित शहा हे नरेंद्र मोदींचे फार आधीपासूनचे संकटमोचक मानले जातात. चीनी व्हायरस कोविड १९ चा यशस्वी मुकाबला करण्यात तर अमित शहा हे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वॉर रूममधून सगळी सूत्रे हलवत आहेत.
कोरोनाचा फैलाव सुरू झाल्याबरोबर लॉकडाऊनचा निर्णय होण्याच्या सुरवातीलाच अमित शहांनी आपली कामाची दिनचर्या १६ ते १८ तासांची करून घेतली. संपूर्ण लॉकडाऊनच्या काळात त्यांनी सकाळी ८.३० पासूनच विडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठका घेण्यास सुरवात केली. गृह मंत्रालयातील अधिकारी कोविड १९ शी संबंधित मंत्रालयातील अधिकारी यात सहभागी करवून घेतले. गेल्या १० दिवसांपासून ते सकाळी ८.३० वाजता नॉर्थ ब्लॉकमध्ये येतात. ते रात्री १२.३० वाजेपर्यंत काम करत राहतात. सर्व फायलींचा निपटारा त्याच दिवशी होताना दिसतो. केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव, मुख्य सचिव त्यांच्या संपर्कात असतात.
गृह सचिव, संयुक्त सचिव यांच्या समवेत आढावा, नियोजन आणि अंमलबजावणी यांची भक्कम साखळी तयार केली आहे. यातून समस्यांचे अचूक आकलन होण्यास मदत झालीच पण उपाययोजनाही वेळेत करता येणे शक्य झाले.
डॉक्टर, नर्सवरील हल्ले, घृणास्पद कृत्ये रोखण्यासाठी तातडीने कायद्यात बदल करण्यासाठी पुढाकार अमित शहांनी घेतला. डॉक्टर आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या विडिओ कॉन्फरन्समध्ये या विषयावर चर्चा झाली. तिसऱ्या दिवशी अध्यादेश लागू झाला. डॉक्टरांचा संभाव्य संप अमित शहांनी पुढाकार घेतल्याने मिटला.
कोविड १९ ची चाचणी केंद्रे वाढविण्यात आयसीएमआरला अडचणी येत होत्या. चाचणी केंद्रे वाढविण्याची सूचना अमित शहांनी “एम्स”ला केली. त्यानंतर काहीच दिवसांमध्ये आयसीएमआरने चाचणी केंद्रे वाढविण्यास मान्यता दिली. काही सुविधाही उपलब्ध करून दिल्या. हा अमित शहा effect होता.
राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी अमित शहा नियमित संपर्कात आहेत. राज्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी केरळचे पिनरी विजयन, राजस्थानचे अशोक गहलोत, महाराष्ट्राचे उद्धव ठाकरे यांच्याशी अमित शहांनी चर्चा करून मार्ग काढला आहे. पंतप्रधान मोदींनंतर अमित शहा हे एकमेव केंद्रीय मंत्री थेट मुख्यमंत्र्यांशी बोलू शकतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली मंत्र्यांची विशेषाधिकार समिती तयार केली आहे. या मंत्र्यांमध्ये समन्वयाची जबाबदारी अमित शहाच पार पाडत असतात.
बंगालमध्ये केंद्रीय पाहणी पथकाच्या कामात ममता सरकारने अडथळे निर्माण केले. अमित शहांनी हस्तक्षेप केला. केंद्रीय गृह सचिव अजयकुमार भल्ला यांनी पत्र लिहून तो विषय ठीक केला.