विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : प्रत्येक पेशंटवर कोविड १९ चाचणीची सक्ती करून पेशंटला अन्य सेवा आणि उपचार नाकारू नका, असा गंभीर इशारा केंद्र सरकारने देशातील खासगी हॉस्पिटलना दिला आहे. केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून वरील निर्देश सर्व खासगी हॉस्पिटलना लागू करण्यास सांगितले आहे.
काही खासगी हॉस्पिटल कोविड १९ ची साथ आपल्या हॉस्पिटल मध्ये पसरू नये म्हणून काळजी घेताना प्रत्येक पेशंटवर कोविड १९ ची चाचणी सक्ती करताना आढळले. तशा तक्रारी सोशल मीडिया हँडलच्या माध्यमांमधून थेट केंद्रीय आरोग्य मंत्रालयांपर्यंत पोहोचल्या.
त्यामधील सत्यता तपासल्यानंतर अनेक ठिकाणी खासगी हॉस्पिटल मध्ये पेशंटना कोविड १९ च्या नावाखाली डायलिसीस, रक्त बदल व अन्य तातडीचे उपचार व अत्यावश्यक सेवा – उपचारही नाकारण्यात आल्याचे आढळले. अनेक हॉस्पिटल, क्लिनीक्सनी पेशंटची भरती थांबविल्याचेही आढळून आले. अनेक ठिकाणी स्वतंत्रपणे कोविड १९ च्या चाचण्यांची सक्ती केल्याचे लक्षात आले.
त्यामुळे आरोग्य मंत्रालयाने खासगी हॉस्पिटलना विशेष सूचना जारी केल्या आहेत. कोविड १९ ची चाचणी ICMR प्रोटोकॉलनुसारच झाली पाहिजे, याकडे राज्यांनी काटेकोरपणे लक्ष ठेवावे, अशा सूचना आरोग्य सचिवांनी पत्राद्वारे दिल्या आहेत. प्रसूती सेवा, बदल उपचार, लसीकरण, कोणतेही जीव रक्षक उपचार थांबता कामा नयेत, असेही आरोग्य मंत्रालयाच्या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.