विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या फैलावाला प्रतिबंध करण्यासाठी केंद्र सरकारने कार्यक्षमता दाखविली आणि परिणामकारक उपाययोजना केल्याची सुप्रिम कोर्टाने मुक्तकंठने प्रशंसा केली आहे. सरन्यायाधीश एस. एम. बोबडे, न्या. एल. एन. राव, न्या. सूर्य कांत यांनी सरकारने योग्य प्रकारे या रोगाच्या साथीची दखल घेऊन उपाययोजना केल्या. सर्व सरकारी यंत्रणा कार्यक्षमपणे काम करत आहेत. टीकाकारांनी देखील सरकारच्या प्रयत्नांची स्तुती केली आहे. हा काही राजकारणाचा विषय नाही, अशी टिपण्णी खंडपीठाने केली आहे. नागरिकांनी सरकारी प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद दिला पाहिजे, असे आग्रही प्रतिपादनही खंडपीठाने केले. केंद्राने क्वारंटाइन व्यवस्था वाढवावी, कोरोना टेस्ट लँब वाढवाव्यात, अशा मागण्या करणार्या याचिका सुप्रिम कोर्टात सादर करण्यात आल्या आहेत, त्या सर्व याचिकाकर्त्यांना खंडपीठाने सरकारकडेच निवेदने सादर करण्यास सांगितले.