विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जगातील सर्व देश कोरोनवारील लसीसंदर्भात संशोधन करीत आहेत. भारतही त्यात मागे नसून देशातील ३० गट लसीवर संशोधन करीत आहेत. सध्याची स्थिती पाहता ऑक्टोबर महिन्यापासून त्यांच्या क्लिनीकल ट्रायल्सला प्रारंभ होईल. असे प्रतिपादन देशाचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार डॉ. के. विजय राघवन यांनी गुरुवारी पत्रकारपरिषदेत केले.
भारतात सध्या विविध ३० गट लसीवर संशोधन करीत आहेत. काही कंपन्या फ्लू व्हॅक्सिनमध्ये संशोधन करीत आहे, ऑक्टोबरपर्यंत त्यांच्या क्लिनिकल ट्रायल्सला प्रारंभ होऊ शकतो. काही कंपन्या फेब्रुवारी २०२१ पर्यंत प्रोटीनआधारित लस विकसित करू शकतील. देशातील काही स्टार्टअप्स आणि तज्ज्ञदेखील तसे पर्यत्न करीत आहेत. त्याचप्रमाणे काही परदेसी कंपन्यांसोबत भागिदारी करण्यात आली आहे तर काही परदेशी कंपन्यांच्या संशोधनात भारत आघाडीवर आहे. त्याचप्रमाणे देशात सध्या बीसीजी लसीवरही संशोधन सुरु असून ती लस कोरोनाविरोधात यशस्वी ठऱले, असा संशोधकांचा कयास असल्याची माहिती विजयराघवन यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की, सर्वसामान्यपणे लस तयार करण्यात १० ते १५ वर्षे लागतात, मात्र आता तीच प्रक्रिया अवघ्या एक ते दीड वर्षात पूर्ण करायची आहे. त्यामुळे एरवी लागतो त्यापेक्षा दहापट जास्त खर्च येणार आहे. जगात सध्या एकाचवेळी १०० लसींवर संशोधन सुरू आहे, त्यामुळे संशोधनासोबतच गुणवत्तेकडेही विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. त्याचप्रमाणे लस विकसित झाल्यानंतर ती प्रत्येकापर्यंत पोहोचविणे देखील महत्वाचे आहे, त्यामुळे सध्या जगभरात एकाचवेळी अनेक आघाड्यांवर काम सुरू आहे. सर्वसाधारणपणे लसी तयार करण्याचे चार प्रकार आहेत- पहिला म्हणजे एमआरएनए व्हॅक्सीन, दुसरा म्हणजे स्टॅडंर्ड व्हॅक्सीन, तीसरा म्हणजे एखाद्या अन्य विषाणूच्या पाठीत कोरोना विषाणूचे प्रथिने टोचणे आणि चौथा प्रकार म्हणजे प्रयोगशाळेत विषाणूचे प्रथिन तयार करून त्यास स्टिम्यूलसोबत एकत्र करणे. भारतातदेखील या चार पद्धतींचा वापर होत असल्याचे विजयराघवन यांनी सांगितले.
लसीसोबतच देशात औषधांवरही संशोधन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. देशात सध्या हायड्रॉक्सिक्लोक्विनसह अन्य तीन औषधांवर संशोधन सुरु आहे. त्याचप्रमाणे सीएसआयआर आणि एआयसीटीई यांनी एक ड्रग हॅकेथॉनला प्रारंभ केला आहे, ज्यात विद्यार्थी तज्ज्ञ सहभाग घेत आहेत. तसेच भारताने तीन प्रकारच्या नव्या चाचणीपद्धतीही विकसित केल्या आहेत. त्याचप्रमाणे देशातील २० पेक्षा जास्त कंपन्यांनी भारतीय बनावटीचे चाचणी किट्स तयार केले आहेत. येत्या २० जुलैपर्यंत प्रतिदिन ५ लाख किट्सच उत्पादन करण्यात येणार आहे.
लस उत्पादनात भारत अग्रणी
संपूर्ण जगभरात भारतात तयार होणाऱ्या लसींचा वापर केला जातो. जगभरात लहान मुलांना देण्यात येणाऱ्या तीनपैकी २ लसी या भारतात तयार होतात. गेल्या काही वर्षांपासून भारतीय कंपन्यांनी उत्पादनासोबतच संशोधनातही आघाडी घेतली आहे. त्याचप्रमाणे भारतीय औषधनिर्माण क्षेत्रही जगात अग्रेसर असल्याचे विजयराघवन यांनी सांगितले.