विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी आयुषमान भारत योजनेतून कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने घेतला आहे. देशातील तब्बल १० कोटी ६८ लाख कुटुंबांतील सुमारे ५० कोटी व्यक्तींना पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार, विविध चाचण्यांच्या सुविधा मोफत उपलब्ध होणार आहेत. सरकार करतयं काय?, या प्रश्नाला या एका निर्णयाने खणखणीत उत्तर मिळाले आहे. आयुषमान भारत योजना तथा प्रधानमंत्री जनआरोग्य योजना ही बीपीएलधारक, मध्यम वर्ग, निम्न मध्यम वर्ग यांना लागू होते. २७ पेक्षा अधिक गंभीर विकारांवर, १४०० पेक्षा अधिक चाचण्या व उपचार या योजनेतून कव्हर होतात. देशभरात या योजनेत रजिस्टर झालेल्या सर्व रुग्णालयांमध्ये आठवडाभरात कोरोना उपचार व विविध चाचण्यांची सुविधा उपलब्ध होईल, असे आरोग्य प्राधिकरणाच्या अधिकार्यांनी सांगितले. या खेरीज याच योजनेत अन्य साथीच्या विकारांवरील उपचारांचाही समावेश करण्याचा विचार असल्याचे प्राधिकरणाच्या अधिकार्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे देशाच्या एक तृतीयांश लोकसंख्येच्या आरोग्यावरील खर्चाच मोठा भाग सरकार उचलण्याच्या तयारीत आहे. नीती आयोगाकडे आर्थिक तरतुदीच्या मंजुरीसाठी संबंधित प्रस्ताव देण्यात आला आहे. त्याला तातडीची मंजूरी अपेक्षित आहे.