कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका करायला सुरूवात केल्यावर कॉंग्रेसच्या इतर नेत्यांनाही चेव आला आहे. मात्र, प्रत्यक्षात टीका करण्यासारखे काही दिसत नसल्याने खोट्या गोष्टी पसरविल्या जात आहेत. कॉंग्रेसच्या एका महिला नेत्याने असाच एक दोन वर्षांपूर्वीचा व्हिडीओ सद्यपरिस्थिती म्हणून ट्विट केला. कॉंग्रेस नेते शशी थरुरही गंडले गेले आणि त्यांनीही हा व्हिडीओ रिट्विट केला.
विशेष प्रतिनिधी
पुणे : कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका करायला सुरूवात केल्यावर कॉंग्रेसच्या इतर नेत्यांनाही चेव आला आहे. मात्र, प्रत्यक्षात टीका करण्यासारखे काही दिसत नसल्याने खोट्या गोष्टी पसरविल्या जात आहेत. कॉंग्रेसच्या एका महिला नेत्याने असाच एक दोन वर्षांपूर्वीचा व्हिडीओ सद्यपरिस्थिती म्हणून ट्विट केला. कॉंग्रेस नेते शशी थरुरही गंडले गेले आणि त्यांनीही हा व्हिडीओ रिट्विट केला.
सध्या देशात सर्वत्रच मजूर प्रवाशांची स्थिती दाखवून केंद्र सरकारचे अपयश दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे. काँग्रेसच्या नेत्या अर्चना डालमिया यांनी असाच एक व्हिडीओ शेअर केला. त्यामध्ये व्हिडिओत दोन मुलांसोबत एक महिला दिसत आहे. त्या मुलांची ती आई आहे. आई बेशुद्ध पडली आहे आणि मुले आईच्या डोक्यावर पाणी टाकत आहेत. या व्हिडीओसोबत डालमिया यांनी लिहिले आहे की, आयुष्य इतकं स्वस्त झालं आहे का? आई असलेल्या जगातल्या सर्व महिलांना मी आवाहन करते की हे दृश्य पाहा. हे एखाद्या चित्रपटातील नाही. कुटुंबे रस्त्यावर भटकत आहेत. भाजप, का तुमची पार्टी पण जागी होऊ शकत नाही?
काँग्रेसचे नेते शशि थरूर यांनीही हा व्हिडिओ रिट्विट केला आहे. परंतु, नंतर अर्चना डालमिया यांनीच हा व्हिडिओ डिलीट केला आहे.
हा व्हिडीओ म्हणजे डालमिया यांची चालबाजीच आहे. तो दोन वर्षे जुना आहे. २०१८ मध्ये यू ट्यूबवर अपलोड केलेला आहे. मात्र, यातून कॉंग्रेस नेत्यांची मानसिकता समजत आहे, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी टीका केली आहे. प्रत्यक्षात टीका करण्यासारखे काहीच हाती लागत नसल्याने कॉंग्रेस नेत्यांना आरोप करण्यासाठीही काही मिळत नाही. त्यामुळे ते खोट्या गोष्टी पसरवित आहेत.