विशेष प्रतिनिधी
पुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांसोबत येणाऱ्या पावसाचे (मॉन्सून) आगमन यंदा केरळ किनाऱ्यावर 5 जुनला होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिला आहे. या अंदाज चार दिवसांनी पुढे-मागे होऊ शकतो, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. दरवर्षी 1 जुनच्या सुमारास केरळात मॉन्सून दाखल होतो. यंदा हे आगमन चार दिवसांनी विलंबाने होण्याची शक्यता आहे.
जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत भारतात येणाऱ्या मॉन्सून पावसावर देशाचे संपूर्ण अर्थकारण आणि समाजकारण अवलंबून असते. वर्षातल्या एकूण पावसापैकी 75 टक्के पाऊस याच चार महिन्यात पडतो. यंदा पावसाळा सरासरीइतका असेल, असे आयएमडीने यापुर्वीच पहिल्या अंदाजात जाहीर केले. आयएमडीचा दुसरा अंदाज शुक्रवारी (ता. 15) जाहीर करण्यात आला.
बंगालच्या उपसागरात आलेल्या चक्रीवादळामुळे अंदमान आणि निकोबार बेटांवर मॉन्सून यंदा 16 मेपर्यंत दाखल होईल, असे सांगण्यात आले. दरवर्षी 22 मेपर्यंत अंदमानात मॉन्सून येतो. गेल्यावर्षीही 18 मे रोजी मॉन्सून अंदमानात दाखल झाला होता. परंतु, त्यानंतर केरळपर्यंतचा मॉन्सूनचा प्रवास विलंबाने झाला. गेल्यावर्षी केरळात 8 जुनला मॉन्सूनचे आगमन झाले. संपूर्ण देश मॉन्सूनने व्यापण्यास 19 जुलै ही तारीख उजाडली होती.
सन 1960 ते 2019 या वरर्षांमधल्या आकडेवारीच्या आधारे आयएमडीने मान्सून आगमनाचा अंदाज वर्तवण्याची सुरुवात यंदापासून केली. त्यानुसार महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडिशा, झारखंड, बिहार आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांत मान्सून पोहोचण्यास त्यांच्या सरासरी तारखेपेक्षा थोडा उशीर करेल, असा अंदाज आहे. राजधानी दिल्लीत 23 ते 27 जून यादरम्यान मॉन्सून पोहोचेल. मुंबई आणि कोलकाता या शहरांमध्ये 10 ते 11 जुनच्या दरम्यान तर चेन्नईत 1 ते 4 जुन दरम्यान मॉन्सून पोहोचण्याची शक्यता आहे. दरम्यान दक्षिण भारतातून मान्सून माघारी फिरण्याची नेहमीची सरासरी तारीख 1 ऑक्टोबर आहे.