महाराष्ट्रातल्या सरकारने कोरोनाची साथ येताच आर्थिक रडगाणे गायला सुरुवात केली. सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करू, पगारासाठी पुरेसे पैसे नाहीत, अशी वक्तव्ये जबाबदार मंत्र्यांकडून केली गेली. राज्य सरकारनेच हात वर केल्यामुळे खासगी क्षेत्रातही त्याचे अनुकरण सुरु झाले आहे. केंद्र सरकारने मात्र या बाबत ठामपणा दाखवत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात होणार नसल्याचे जाहीर केले आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात केली जाणार नसल्याचे अर्थ मंत्रालयाकडून स्पष्ट केले आहे. केंद्र सरकार कोणत्याही श्रेणीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणत्याही प्रकारची कपात करणार नाही, अशी माहिती सरकारने दिली आहे.
याबाबतची सर्व वृत्ते निराधार असल्याचे अर्थ मंत्रालयाने ट्विट करून सांगितले आहे. याबाबत काही माध्यमांमध्ये चुकीची आणि तथ्यहिन बातमी चालविली गेल्याचे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. गेल्या महिन्यात केंद्र सरकारने ५० लाख कर्मचारी आणि ६१ लाख पेन्शनधराकांचा महागाई भत्ता वाढवण्याला स्थगिती दिली होती.
कोरोना व्हायरसविरोधी लढाईत आवश्यक उपाययोजना करण्यासाठी सरकारला निधीची आवश्यकता आहे. या पर्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेला.
एप्रिल महिन्यातही मंत्रालयाने अशाच पद्धतीचं एक ट्विट करत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात २० टक्के कपात केली जाणार असल्याचं वृत्त चुकीचं आणि निराधार असल्याचं स्पष्ट केलं होतं. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये २० टक्के कपात केली जाण्याचा विचार केला जात असल्याचं वृत्त दिलं जात आहे. अशी कोणतीही कपात केली जाणार नाही. कर्मचाऱ्यांचा पगार आणि पेन्शनमध्ये कोणतीही कपात करण्याचा विचार नाही, असं मंत्रालयाकडून सांगण्यात आलं होतं.