विशेष प्रतिनिधी
मुंबई : पुण्यातील शनिवार वाड्याच्या पटांगणात दोन वर्षांपुर्वी झालेल्या एल्गार परिषदेनंतर कोरेगाव भीमा येथे दंगल उसळली होती. ही दंगल भडकवण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केले, त्यासाठी पैसा पुरवला या आरोपावरुन बंदी घातलेल्या माओवादी संघटनेच्या सदस्यांना तपास यंत्रणांनी पुढे अटक केली. यांच्याविरोधातली न्यायालयीन कार्यवाही सध्या चालू आहे. मात्र कोरोना विषाणूच्या साथीमुळे या लोकांना तुरुंगातून मुक्त करावे, यासाठी स्वाक्षरी मोहिम राबवली जात आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या कथित माओवाद्यांच्या सुटकेसाठी अनुकूल असल्याचे सांगितले जाते. महाराष्ट्राचे गृहमंत्रीपद देखील राष्ट्रवादी कॉंग्रेसकडेच आहे. मात्र शिवसेनेचे प्रमुख असणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आजवर तरी माओवाद्यांच्या विरोधात कणखर भूमिका घेतलेली आहे. या स्वाक्षरी मोहिमेवर महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दोन घटकांमध्ये जातीय दंगल घडवून देशाचे वातावरण बिघडवण्याचा कट करणे, शहरी नक्षलवादाला प्रोत्साहन देणे, पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचणे आदी आरोपांवरुन कथित माओवादी अटकेत आहेत. यात दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जी. एन. साईबाबा, कवी वरवरा राव, प्रा. शोमा सेन, सुधा भारद्वाज, अरुण फरेरा, व्हर्नन गोंसालविस, सुधीर ढवळे, सुरेंद्र गडलिंग, रोना विल्सन यांच्यासह एकूण 11 जण तुरुंगात आहेत. या सर्वांच्या विरोधात गंभीर पुरावे सापडल्याने न्यायालयानेही त्यांचा जामीन आजवर नाकारलेला आहे. यांच्या सुटकेसाठी आंतरराष्ट्रीय लेखिका अरुंधती रॉय, प्रा. गिल्बर्ट आचर, प्रा. जैरस बानजी, प्रा. शकुंतला बानजी, सुजातो भद्रा, तरुण भारतीय, प्रा. कमल मित्र, बर्नार्ड द मिलो, एस के दास, विद्याधर दाते, ऋतुजा देशमुख, झेवीयर दास, हर्ष कपूर आदी अनेकांनी समर्थन जाहीर केले आहे.
अटकेत असलेल्या प्रा. शोमा सेन यांची मुलगी कोयल यांनी या स्वाक्षरी मोहिमेसाठी पुढाकार घेतला आहे. कोयल सेन यांनी म्हटले आहे की, कोरोनाच्या साथीमुळे सर्वोच्च न्यायालयाने कैद्यांना पॅरोल आणि जामिनावर सोडण्यास सुरुवात केली आहे. माझी आई शोमा सेन आणि एल्गारशी संबंधित आणखी काही तुरुंगात आहेत. त्यांनाही जामीन द्यावा. माझ्या आजारी आईची मला खूप काळजी वाटते. सद्यस्थिती लक्षात घेऊन त्यांना सोडावे. कोयल सेन यांनी फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुखमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे ही मागणी केली आहे.
दरम्यान, एल्गार आणि माओवाद्यांशी संबंध असल्याच्या प्रकरणाची कागदपत्रे आणि सुनावणी मुंबईच्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) न्यायालयात वर्ग करण्यात आली आहेत. या प्रकरणाची सुनावणी सध्या मुंबईत सुरू आहे. कोयल सेन यांच्या म्हणण्यानुसार कोरोना विषाणूची लागण तुरुंगात होण्याची शक्यता आहे. दहशतवादी आणि देशविघातक कारवायांमुळे बंदी घालण्यात आलेल्या माओवादी संघटनेशी संबंध असल्याचा आरोप सेन यांच्या आई प्रा. शोमा सेन व अन्य अटकेतील असलेल्यांवर आहे. कोयल सेन यांनी मात्र या सर्वांचा उल्लेख राजकीय कैदी असा केला आहे. या राजकीय कैद्यांना तुरुंगात योग्य उपचार मिळणार नाहीत. त्यामुळे त्यांना जामीन द्यावा, असे त्यांचे म्हणणे आहे.