कोरोना चाचणी स्वॅब्जच्या पूर्वी भारताच्या स्वयंपूर्णतेची कहाणी पीपीई किटस आणि एन ९५ मास्कमध्ये पाहायला मिळाली आहे. मार्चअखेर फक्त साडेतीन हजार किटस उत्पादित होत होते, पण आता प्रतिदिन तीन लाख किटस बनत आहेत. एन ९५ मास्कचे उत्पादनही ६० हजारांवरून ३.५ लाखांवर पोहोचले आहे.
सागर कारंडे
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भरतेचा संकल्प केल्यानंतर विरोध पक्ष व त्यांच्या टीकाकारांनी आत्मनिर्भरतेची खिल्ली उडविण्यास सुरूवात केली आहे. त्याच्यावर अनेक मीम्स बनले, बोचरे चिमटे घेण्यात आले. पण आत्मनिर्भरता म्हणजे नेमके काय, हे जर समजून घ्यायचे तर त्या मांदियाळीत आणखी एक उदाहरण जोडले गेले आहे. त्याचे नाव कोरोना चाचण्यांसाठी लागणारे स्वॅब्ज…
नाकातील किंवा घशातील स्त्रावांचे सॅम्पल घेण्यासाठी लागणारे हे स्वॅब्ज आतापर्यंत भारतात बनतच नव्हते. ते चीन किंवा अमेरिकेमधूनच आयात करावे लागतात आणि त्याची किंमत किमान १७ ते ३० रूपये इतकी पडते. त्यामुळे या स्वॅब्जचा समावेश असलेल्या व्हीटीएम किटसची (व्हायरल ट्रान्स्पोर्ट मीडियम) किंमतही १८० ते १९० रूपयांपर्यंत जाते.
आता स्वॅब्ज भारतामध्ये बनू लागल्याने त्याची किंमत चक्क १७ ते ३० रूपयांवरून थेट दोन रूपयांपर्यंत आली आहे. म्हणजे जवळपास दहा पटीने ते आपल्याला स्वस्त पडू लागले आहे. परिणामी व्हीटीएमची किंमतसुद्धा १८० ते १९० रूपयांवरून दीडशे रूपयांपेक्षा कमी झाली आहे. या व्हीटीएम किट मध्ये दोन स्वॅब्ज आणि एक काचेची ट्यूब असते आणि त्यामध्ये एक द्रव (मीडिया) असतो. स्वॅब्जद्वारे घेतलेले सॅम्पल या ट्यूबमधील द्रवामध्ये ठेवले जातात आणि मग ते प्रयोगशाळेमध्ये चाचणीसाठी घेऊन जातात.
जेव्हा या चायनीज व्हायरसचा प्रादुर्भाव वाढायला लागला, तेव्हा फेब्रुवारीच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेवरून आरोग्य मंत्री डाॅ. हर्षवर्धन व वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी हे स्वॅब्ज भारतात कसे बनविता येईल, याची चाचपणी सुरू केली होती. इअर बड्स (कानातील मळ काढणारी छोटी वस्तू) उत्पादक कंपन्यांशी त्यांनी संपर्क साधला. त्यामध्ये जाॅन्सन अँड जाॅन्सन व ट्युलिप्स या दोन मुख्य कंपन्यांचा समावेश होता. या दोन्ही कंपन्यांनी पुण्यातील प्रतिष्ठित एनआयव्हीच्या (राष्ट्रीय विषाणू संस्था) मदतीने आणि अन्न व औषध प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे हे स्वॅब्जचे डिझाईन पूर्ण केले आणि त्यास आयसीएमआरची (भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था) मान्यता घेऊन आता उत्पादनाला प्रारंभही केला आहे.
हे सिथेंटिक टिप्स स्वॅब्ज आता नाॅयलाॅन, डक्राॅन, पाॅलिस्टरपासून बनत आहेत. ट्युलिप्सने आपल्या गाझियाबाद येथील कारखान्यात दर आठवड्याला वीस लाख स्वॅब्ज बनविण्यास प्रारंभ केला आहे, तर जाॅन्सन अँड जाॅन्सनची सुद्धा उत्पादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. दुसरीकडे, आयातीची झंझट राहणार नसल्याने भट बाॅयोटक, हायमीडिया यासारख्या व्हीटीएम उत्पादक कंपन्यांनीही आपले उत्पादन जवळपास दुपटीने वाढविले आहे.
या स्वॅब्जच्याअगोदर भारताच्या स्वयंपूर्णतेची कहाणी डाॅक्टर्स व नर्सेसना लागाणारया पीपीई किटस (व्यक्तिगत सुरक्षा उपकरणे) आणि एन ९५ मास्कमध्ये पाहायला मिळाली आहे. ३० मार्चरोजी भारतात फक्त साडेतीन हजार पीपीई किटस उत्पादित होत होते, पण आता प्रतिदिन तीन लाखांच्या आसपास पीपीई किटस बनू लागले आहेत. असेच एन ९५ मास्कमध्ये झाले आहे. ३० मार्चरोजी देशात प्रतिदिन ६० हजार एन ९५ मास्क बनत होते. या मास्कचे उत्पादनही आता प्रतिदिन साडेतीन लाखांच्या आसपास पोहोचले आहे. या दोन्ही गोष्टींचा मोदींनी आत्मनिर्भरतेची संकल्पना स्पष्ट करताना आवर्जून उल्लेख केला होता. आत्मनिर्भर म्हणजे स्वयंपूर्ण आणि जागतिक ब्रँडस बनविणे, असे त्यांनी स्पष्ट केले होते.
We used to import collection swabs at Rs. 17 frm China. Govt contacted the largest Indian polyester manufacturer to locally design swab. Got the design & material approved from NIV & gave manufacturing orders to MSMEs. Today, India manufacturers these at Rs. 2!
— Varun Jhaveri (@Varun_Jhaveri) May 16, 2020
Vocal for Local! pic.twitter.com/V3h6lNch3Z