• Download App
    अखिलेश म्हणतात...माझी 'सायकल' राहुलच्या 'हाता'त हात नको ! | The Focus India

    अखिलेश म्हणतात…माझी ‘सायकल’ राहुलच्या ‘हाता’त हात नको !

    उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी २०२० च्या विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेसला सोबत घेण्यासंदर्भात  उत्सूकता दाखवलेली नाही. मायावती यांच्यापासूनही फारकत घेण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. एकट्याच्या बळावरच निवडणुका लढविण्याच्या दिशेने अखिलेश यादव पावले उचलत असल्याने उत्तर प्रदेशातील लढत चौरंगी होणार असल्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. 


    विशेष प्रतिनिधी
    लखनऊ : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी २०२० च्या विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेसचा हात हातात घेण्यास नकार दिला आहे. समाजवादी पक्ष एकट्याच्या बळावरच निवडणुका लढविणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बहुजन समाज पक्षाशीही युती करण्याबाबत अखिलेश यादव यांची भूमिका नकारात्मक आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील आगामी लढत चौरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
    गेल्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात कॉँग्रेस आणि समाजवादी पक्ष एकत्र आले होते. समाजवादी पक्षाने  २९८  तर काँग्रेसने १०५ जागा लढविल्या होत्या. समाजवादी आणि काँग्रेसची युती ही विचारांवर आधारीत असल्याचे कॉंग्रेसच्या राहुल गांधी यांनी म्हटले होते. “हाताला सायकलची आणि सायकलला हाताची साथ असेल तर विकासाची गती कशी राहील,” असा प्रश्न उत्तरप्रदेशच्या जनतेला करीत अखिलेश यादव यांनी काँग्रेस आणि समाजवादी हे पक्ष प्रगती आणि समृद्धतेची दोन चाके असल्याचा दावा केला होता. ‘बेबी को बेस पसंद है’ या गाजलेल्या गाण्याच्या धरतीवर ‘युपी को ये साथ पसंद है,’ असे घोषवाक्यही त्यावेळी प्रचारात वापरण्यात आले होते.
    मात्र, त्यानंतरही कॉंग्रेस-समाजवादी पक्ष या युतीला उत्तर प्रदेशच्या जनतेने नाकारले होते. या दोन्ही पक्षांना अवघ्या ५४ जागा मिळाल्या होत्या. १०५ जागांवर निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसला फक्त ७ ठिकाणी विजय मिळवता आला होता. समाजवादी पक्षालाही मोठा फटका बसला होता. त्यामुळे गेल्या चार वर्षांत अखिलेश यादव कॉँग्रेसपासून चार हात दूर राहिले होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांची युती झाली. धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन नको अशी भूमिका मांडली जात असतानाही या दोन्ही पक्षांनी कॉँग्रेसला बरोबर घेतले नव्हते. सपा-बसपा युतीचा लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल आणि ही युतीही तुटली. त्यामुळे आता अखिलेश यादव यांनी एकला चलो रे ची भूमिका घेतली आहे.

    Related posts

    एनडीटीव्हीच्या फेक न्यूजने कोट्यवधींच्या आशेला ग्रहण लावण्याचा प्रयत्न; लशीबाबतचे खोटे वृत्त आरोग्य मंत्रालयाने फेटाळले

    कॅनडा पाठोपाठ ब्रिटनने शेतकरी आंदोलनात नाक खुपसले -३६ ब्रिटिश खासदारांनी ब्रिटन सरकारला लिहिले पत्र

    राहुल गांधींच्या नेतृत्वावर पवारांचा वार; यशोमती ठाकुरांचा पवारांवर पलटवार