विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ऐंशीच्या दशकात दुरदर्शनवर आलेल्या ‘रामायण’ या मालिकेने प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. या मालिकेत सीतेची भूमिका केलेल्या अभिनेत्री दिपीका चिखलिया यांनी नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यासोबतचा ऐंशीच्या दशकातील फोटो ट्वीटरवर प्रसिद्ध केला आहे. या छायाचित्रावर नेटकऱ्यांकडून लाईक्सचा पाऊस पडत आहे.
सोज्वळ अभिनयाच्या माध्यमातून रामायण मालिकेतील ‘सीतामैय्या’ झालेल्या दिपीका चिखलिया यांनी ऐंशीच्या दशकाअखेरीस जनमानसावर राज्य केले होते. चिखलिया यांनी नुकतेच ट्वीटरवर पदार्पण केले. ऐंशीच्या दशकात भारतीय जनता पार्टीचे साधे कार्यकर्ते असणारे नरेंद्र मोदी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासमवतेचा हा फोटो आहे. त्याखाली दीपिका चिखलिया यांनी असे लिहिले आहे की, “तेव्हाचे बडोदा आणि आताच्या वडोदऱ्यातून निवडणुकीसाठी मी उभी राहिले होते तेव्हाचा हा फोटो आहे. या जुन्या फोटोत आताचे आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लालकृष्ण अडवाणीजी, मी आणि आमच्या निवडणूक प्रभारी नलिन भट्ट आहेत.”
या फोटोला अवघ्या काही तासातच वीस हजारांपेक्षा जास्त लोकांनी लाईक्स केले. दिपिका चिखलिया यांनी तेव्हा वडोदऱ्याची लोकसभा निवडणुका जिंकली आणि भाजपा खासदार म्हणून त्या लोकसभेत पोहोचल्या. ती सन 1991 ची निवडणूक होती. चिखलिया यांनी काही दिवसांपूर्वी ‘रामायण’ मालिकेतील सर्व कलाकारांचे जुने चित्र शेयर केले होते. सध्या लॉकडाऊन चालू असल्याने ‘रामायण’ ही मालिका दूरदर्शनवरुन पुन्हा प्रसारीत केली जात आहे. त्यामुळे सुमारे तीस वर्षे जुन्या या मालिकेला नव्या पिढीतील प्रेक्षकांचाही तितकाच जोरदार प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळेच ट्वीटरवरही दिपीका चिखलिया सध्या हिट होत आहेत. नुकत्याच प्रदर्शित होऊन गेलेल्या ‘बाला’ चित्रपटात यामी गौतमीच्या आईच्या भूमिकेत दिपीका चिखलिया चमकल्या होत्या. सरोजिनी नायडू यांच्यावर येणाऱ्या आगामी बायोपिकमध्येही चिखलीया यांची भूमिका असणार आहे.