विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : चीनी व्हायरस कोविड १९ चा प्रभावी मुकाबला करण्यासाठी देशभरातील लॉकडाऊनची मुदत वाढविण्याची सूचना बहुसंख्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली. या सूचनेवर केंद्र सरकार विचार करत आहे, असे सरकारने दुपारी स्पष्ट केले.
पंतप्रधान मोदी यांनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी विडिओ कॉन्फरन्सद्वारे तिसरा संवाद साधला. या वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आदी मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनची मुदत एप्रिल महिनाअखेर पर्यंत वाढविण्याची सूचना केली. त्यावर मोदींनी ताबडतोब केंद्र सरकारचा निर्णय सांगितला नाही. अर्थात केंद्र सरकार या सूचनांचा गांभीर्याने विचार करत असल्याचे ट्विट केंद्र सरकारचे मुख्य प्रवक्ते के. एस. धातिवाल यांनी केले.
पंतप्रधान मोदी यांनी लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतल्याचे ट्विट अरविंद केजरीवाल यांनी केले होते. त्यावर धातिवाल यांनी रिट्विट करून केंद्र सरकारने लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय अद्याप घेतला नसल्याचा खुलासा केला.
तत्पूर्वी, पंतप्रधान मोदी यांनी सर्व मुख्यमंत्र्यांना खुलेपणाने राजकारण बाजूला ठेवून आपापल्या राज्यातील कोविड १९ च्या प्रादूर्भावानंतर उद्भवलेल्या स्थितीची माहिती देण्याचे आणि सूचना करण्याचे आवाहन केले. त्यावर सर्व मुख्यमंत्र्यांनी राज्यांच्या आरोग्य स्थितीबरोबरच राज्यांच्या आर्थिक स्थितीबद्दल सविस्तर निवेदने केली.
PM has taken correct decision to extend lockdown. Today, India’s position is better than many developed countries because we started lockdown early. If it is stopped now, all gains would be lost. To consolidate, it is imp to extend it
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) April 11, 2020
लॉकडाऊन काळात राज्यांमध्ये शेती, उद्योगांना अंशत: सुरू करण्याची परवानगी देऊन आर्थिक घडामोडींना चालना देण्याची सूचना बहुतेक मुख्यमंत्र्यांनी केली. पंजाब, महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये शेतीच्या कामांवर बंधने नाहीत. आणखीही कामांवरील बंधने शिथिल करता येतील का ते पाहावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या.
पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी राज्यातील गव्हाची खरेदी केंद्राने थांबवू नये. त्याची आधारभूत किंमत वाढवून खरेदी करावी अशी सूचना केली. शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याज माफ करून त्याच्या परतफेडीची मुदतही वाढविण्याची मागणी त्यांनी केली. त्याला उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक मुख्यमंत्र्यांनी दुजोरा दिला.