• Download App
    लहरी राजा प्रजा आंधळी अर्थात....उद्धव ठाकरे सरकार! | The Focus India

    लहरी राजा प्रजा आंधळी अर्थात….उद्धव ठाकरे सरकार!

    पत्रकारितेची, प्रसार माध्यमांची मुस्कटदाबी करण्याचा निर्णय कधीकाळी स्वतः संपादक असलेल्या उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. वृत्तपत्रांनी छपाई करावी पण घरोघर त्याचे वितरण करु नये, असा अतर्क्य निर्णय उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी सरकारने घेतला आहे. इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणिबाणीच्या काळातील वृत्तपत्रांवरील सेन्सॉरशिपची आठवण करुन देणारा हा निर्णय आहे. या ‘हिटलरशाही’वर सोशल मीडियातून कडाडून टीका होत आहे.


     महेश म्हात्रे

    लाॅकडाऊन काळात पेपरचे शटडाऊन
    करोना साथीमुळे समाजातील अनेक घटकांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जवळपास दिडशे वर्षांपासून समाजात जागल्या, पहारेकरी म्हणून काम करणारी वृत्तपत्रे मात्र कोरोनापेक्षा सरकारी माथेफिरुपणामुळे अस्तंगत होतील की काय आणि त्यामुळे बातमीदार ते संपादक, मुद्रक, प्रकाशक, जाहिरात, देणारे, आणणारे, वितरक आणि अखेरचा घरोघरी पेपर टाकणारी मुलं अशा हजारो लोकांना रोजगार देणारा हा उद्योग आता लाॅकडाऊनच्या निमित्ताने एका शासकीय फतव्याने शटडाऊन करण्याचं कारस्थान सुरू आहे.

    मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, एका गाजलेल्या संपादकांचे, प्रबोधनकार यांचे नातू, ख्यातनाम व्यंगचित्रकार आणि धाडसी संपादक बाळासाहेब याचा मुलगा आहेत.

    उध्दव जी जे कालपरवा पर्यंत ‘सामना’ या मुखपत्राचे संपादक होते, आज त्यांच्या पत्नीकडे सामनाचे संपादकपद आहे. आणि तरीही येत्या 20 तारखेपासून वृत्तपत्र, साप्ताहिकांचे घरोघरी होणारं वितरण जबरदस्तीने थांबवण्याचा आदेश काढताना त्यांचा हात कसा थरथरला नाही असा मला प्रश्न पडलाय.

    आपल्या वाडवडिलांनी ज्या मुद्रित माध्यमातून आपले आभाळाएवढे अस्तित्व निर्माण केलं. ते माध्यम एवढ्या सहजपणे नष्ट करणं या अविचारी कृतीचा उध्दव ठाकरे यांच्या मनात विचार कसा आला असेल, आणि मग आपण त्यां निर्णयाला नतद्रष्टपणा म्हणून संभावना करणं योग्य ठरणार नाही का ?
    प्रबोधनकार आणि सामनाकारांचा लढाऊ वारसा उध्दव ठाकरे भलेही विसरतील कारण ते आता मुख्यमंत्री आहेत, निवडणुका होऊन गेल्या आहेत, आता निकड नसताना त्यांना पत्रकारितेच्या परंपरेचा काय अभिमान असणार?

    पण त्यांनी एक गोष्ट विसरून चालणार नाही, आज राज्यपाल नियुक्त आमदार होऊन तुम्ही आपले मुख्यमंत्री पद वाचवणार आहात, पण त्यासाठी, तुम्ही माजी संपादक असणं ही एकमेव बाब तुम्हाला उपयोगी ठरणार आहे… किमान या वस्तुस्थितीचा तरी विचार करा … तुमच्या सामना च्या पारंपरिक वाचकांना नघाबरता सांगा… हो हा निर्णय झाला आहे…घरोघरी वृत्तपत्रे वितरणावर बंदी आणून, पर्यायाने हजारो मुलांना, लोकांना, पत्रकार, विचारवंतांना बेरोजगारीच्या खाईत ढकलून उध्दव ठाकरे स्वताचे नाव इतिहासात काळ्या अक्षराने लिहीत आहेत…

    आम्ही तमाम पत्रकार या हिटलरशाहीचा फक्त निषेध करून थांबणार नाही. तर या निर्णयाला प्राणपणाने विरोध करू…. तुमचं मत परिवर्तन, मन परिवर्तन होईपर्यंत तुम्हाला मुद्रित माध्यमांचे महत्व समजावून सांगत राहू… पण हा, वृत्तपत्रांच्या जीवावर उठणारा आपला असला आदेश जीवात जीव असे पर्यंत मानणार नाही… तुमचं डोकं ठिकाणावर आहे का ? असा प्रश्नही विचारणार नाही… उद्या सकाळी तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोसमोर उभे रहा… आणि त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बघा… बस्स… उध्दवजी एवढंच करा… तुमच्या निर्णयावर तुम्ही किती ठाम रहाता ते अवघा महाराष्ट्र पाहिल… आणि हो आम्ही पत्रकार ही तयार आहोत… सरकारचा #सामना करण्यासाठी.

    एकीकडे लाॅकडाऊनग्रस्त असलेले बहुसंख्य लोक सध्या आपल्या जुन्या सवयी, अंगवळणी पडलेल्या सोयी सुविधा विसरून जाताना दिसताहेत. पण आपली ‘सकाळ’ किंवा ‘प्रभात’ वर्तमानपत्रा शिवाय होणं हे मात्र अनेकांच्या अजूनही पचनी पडायला तयार नाही. व्यक्ती मग ती ‘हिंदू’ असो , ‘पुढारी’ असो वा ‘वार्ताहर’, ‘वृत्तपत्र’ (न्यूज पेपर) हे प्रत्येकाला हवेच. मुख्य म्हणजे ‘लोकसत्ता’ टिकवण्यासाठी, ‘लोकमत’ घडविण्यासाठी आणि ‘नवशक्ती’पूर्ण ‘तरूण भारता’चे ‘ऐक्य’ करण्यासाठी वृत्तपत्रांनी खूप मोठे योगदान दिले आहे. सर्व सामान्यांसाठी सरकारशी ‘सामना’ देत, ‘लोकहितवादा’ची पाठराखण करीत ‘देशोन्नत्ती’साठी वृत्तपत्रे आजवर झटत होती… रोजच्या ताज्या घडामोडींच्या वार्ता देणे, जाहिराती प्रसृत करुन उद्योग व व्यवसायाला चालना देणे, ‘जनमत’ घडवणे, आवश्यक असल्यास प्रभावित करणे. प्रसंगी लोकलढा उभा करून राष्ट्रीय चळवळीला, संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाला आकार देण्यासाठी आपल्या मुद्रित माध्यमातून स्वातंत्र्य पूर्वकाळात आणि नंतरही खूप मोठे काम झाले आहे. टिळक, आगरकर, आंबेडकरांपासून आचार्य अत्रे, बाळासाहेब ठाकरे यांच्या पर्यंत, हा लढाऊ पत्रकारितेचा इतिहास महाराष्ट्र विसरलेला नाही.

    इतिहास जाणतो अनेक बुरसटलेल्या सामाजिक चालीरीती, अंधश्रद्धा आणि कुप्रथा परंपरा विरोधात प्रबोधन करणे, लोकशाहीचा चौथा स्तंभ बनुन शासनसंस्थेवर अंकुश ठेवणे अशा विविध उद्दिष्टांनी स्वातंत्र्योत्तर कालखंडात विकसित झालेली एक समर्थ व्यवस्था असे वृत्तपत्र-माध्यमाचे वर्णन करता येईल. स्थानिक, देशांतर्गत आणि जागतिक स्वरुपाच्या विविध बातम्या ताबडतोब पुरवणे, हा वृत्तपत्रांचा मुख्य हेतू होता, पण ईंटरनेट युगातील बदलत्याकाळात हे माध्यम मागे पडत असताना उध्दव ठाकरे असा मुद्रित माध्यम विरोधी निर्णय घेत असतील तर त्यांचे हे कृत्य आत्मघातकी आहे. एवढं सांगुन थांबतो….

    (महेश म्हात्रे यांनी हा लेख त्यांच्या फेसबुक वॉलवर लिहीला आहे.) 

    Related posts

    पनवेलच्या फार्म हाऊसवर सलमान खानला चावला साप, बिनविषारी साप असल्याने बचावला

    ठाकरे – फडणवीस आणीबाणीवरून एकमेकांना भिडले; आणीबाणी लागू करणाऱ्या पक्षातले नेते हसले

    शेतकरी आंदोलनातील हेट स्पिचनंतर योगराज सिंग यांची काश्मीर फाईल्स सिनेमातून हकालपट्टी