विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : “वायनाडमध्ये कोरोनाचा अटकाव करण्यासाठी चांगले काम झाले. याची केंद्रीय आरोग्य याची दखल घेतली आहे, अशा आशयाचे ट्विट केरळमधील वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी केले आणि त्यातच ते फसले. किंबहुना त्यांचा खोटेपणाच त्यातून उघड झाला. कारण केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या रेडझोनच्या १७१ जिल्ह्यांमध्ये वायनाडचा समावेश आहे.
वायनाडमध्ये गेल्या १५ दिवसांत कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. मी तेथील अधिकारी, डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी यांचे अभिनंदन करतो, असे राहुल गांधीनी ट्विटमध्ये म्हटले होते. पण प्रत्यक्षात केरळमधील कासरगोड, मल्लापूरम, कन्नूर, एर्नाकुलम, तिरुअनंतपूरम आणि वायनाड हे जिल्हे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या रेडझोनच्या यादीत समाविष्ट केलेले आहेत.
राहुल गांधींचा हा खोटारडेपणा भाजपचे प्रवक्ते अमित मालविय यांनी “द विक” साप्ताहिकाने प्रसिद्ध केलेल्या माहितीच्या आधारे उघडकीस आणला. कोरोनाग्रस्तांच्या आकड्यांच्या आधारे केंद्राने देशाचे रेडझोन, ऑरेंजझोन आणि ग्रीनझोन असे विभाग पाडले आहेत. यात राहुल गांधींचा मतदारसंघ वायनाड हा कोरोनाग्रस्तांच्या संख्येच्या आधारे रेडझोनमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.