विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : तबलिगी जमातीचा म्होरक्या मौलाना महंमद साद कंधलावी याच्या विरोधात पोलिसांपाठोपाठ सक्तवसुली संचलनालयाने “ईडी”ने मनी लाँड्रींगची केस ठोकली आहे.
मौलाना सादच्या बरोबरीने तबलिगी जमातच्या मरकजच्या सहा पदाधिकाऱ्यांनावरही ईडीने मनी लाँड्रींगच्या फौजदारी केस ठोकल्या आहेत. तबलिगी जमातच्या तसेच मौलाना सादशी संबंधित ट्रस्टच्या नावाने देशातून आणि परदेशातून मिळालेल्या देणग्यांचीही तपासणी ईडी करणार आहे. तबलिगी जमातशी संबंधित बँक खाती, विविध आर्थिक व्यवहार, देणी घेणी या विषयीची महत्त्वाची कागदपत्रे दिल्ली पोलिस आणि आर्थिक गुप्तचर विभागाकडून ईडीला मिळाली आहेत. त्यातील माहितीवर आधारित मनी लाँड्रींगचा फौजदारी गुन्हा मौलाना सादवर दाखल करण्यात आला आहे. मौलाना साद आणि त्याचे सहा सहकारी यांच्या पर्सनल फायनान्सची देखील ईडी चौकशी करणार आहे.
मौलाना साद सध्या फरार आहे. तो सेल्फ क्वारंटाइनमध्ये असल्याचाही दावा करण्यात येत आहे. त्याच्या दोन्ही मुलांची चौकशी दिल्ली पोलिस करीत आहेत. सादच्या सर्व प्रकारच्या मालमत्ता आणि आर्थिक व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. निजामुद्दीनमधील मरकजही बेकायदा असल्याचे बोलले जात आहे. तिच्या सर्व कायदेशीर बाजू दिल्ली पोलिस आणि ईडी तपासत आहेत.
फरार झालेला मौलाना साद खरेच सेल्फ क्वारंटाइन आहे का याचा तपास आणि त्याचा वैद्यकीय अहवाल यांची तपासणीही ईडी करीत आहे. तो बाहेर आल्यावर दिल्ली पोलिस आणि ईडी यांच्या चौकशी आणि तपासणीच्या कचाट्यात तो सापडणार आहे. त्याच्यावर दिल्ली पोलिसांनी ३०४ कलमाखाली तबलिगींच्या बेजबाबदार हत्येसाठी कारणीभूत ठरल्याबद्दल केस दाखल केली आहे.