विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : चीनी व्हायरसच्या सामाजिक संक्रमणाच्या यादीत भारताचा समावेश करण्याची चूक WHO ने मान्य केली आहे.
कोविड १९ च्या संक्रमणाच्या संकटाकडे दुर्लक्ष केले. चीनला अनुकूल ठरेल असे रिपोर्टिंग केले, या मुद्द्यावरून WHO आधीच अमेरिका आणि युरोपियन देशांच्या टीकेचा धनी झाला आहे. त्यातच आता भारताचा समावेश कोविड १९ चे सामाजिक संक्रमण झालेल्या देशांच्या यादीत केल्याने WHO वर टीकेचा भडीमार झाला. अखेर WHO ने चूक कबूल करत भारताचे नाव त्या यादीतून काढून टाकले. मात्र भारतात अनेक शहरांमध्ये समूह संक्रमण वाढले असल्याचे म्हटले आहे. ही स्थिती सामाजिक संक्रमणाच्या अलिकडची आहे.
प्रसार भारतीच्या जागरूकतेमुळे WHO ची चूक उघडकीस आली. ९ एप्रिलला प्रसारित केलेल्या सामाजिक संक्रमणाच्या यादीत भारताचा समावेश करण्यात आला होता. प्रसार भारतीने त्याबाबत WHO कडे विचारणा केली. त्यावेळी सुधारित यादी संदर्भासाठी घेण्याची विनंती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
चीनच्या वुहानमधून कोविड १९ च्या प्रादूर्भावाला सुरवात झाली. तेथे ८३ हजार कोरोना पॉझिटिव्ह सापडले तरी त्या शहराचा समावेश सामाजिक संक्रमणाच्या यादीत करण्यात आलेला नाही. मात्र अमेरिका, युरोपियन देश, दक्षिण आफ्रिका यांचा समावेश सामाजिक संक्रमणाच्या यादीत करण्यात आला आहे.