- तज्ज्ञांचे मत : रोज रात्री असते हीच स्थिती
- ग्रीड फेल्युअरची नाही शक्यता
विशेष प्रतिनिधी
मुंबई : देशातील नागरिकांनी एकाच वेळी विद्युत दिवे बंद केल्यास विद्युत निर्मिती आणि वहन यंत्रणेवर कोणताही परिणाम होणार नाही. संपूर्ण विद्युत प्रणाली स्वयंचलित असल्याने यंत्रणा आपोआप बंद होईल. त्यामुळे यंत्रणा कोलमडणार नाही. रात्री देखील आपण सर्वच जण दिवे बंद करुन झोपतो. तरी देखील यंत्रणा कार्यरतच असते. सध्याचे आधुनिक तंत्रज्ञान लक्षात घेता नऊ मिनिटे दिवे बंद झाल्याने किंवा दहाव्या मिनिटाला सगळे दिवे एकदम सुरु झाल्याने ‘ग्रिड फेल्युअर’ची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे नागरिकांनी अनाठायी भीती बाळगण्याचे कारण नसल्याचे नये मत महावितरण आणि महापारेषणच्या निवृत्त अधिकाऱ्यांचे आहे.
कोरोना विरोधातील लढ्यात देशातील एकतेसाठी देशवासीयांनी घरातील दिवे रविवारी (दि. 5) रात्री नऊ वाजता नऊ मिनिटांसाठी बंद करावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. यावरुन उलटसुलट चर्चा सुरु झाल्या. अचानक दिवे बंद-चालू केल्याने मागणीत होणारी घट आणि वाढ या मुळे विद्युत वारंवारीतेत (फ्रीक्वेन्सी) बदल होऊन यंत्रणा कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या संबंधी वीज क्षेत्रातील जाणकारांनी मात्र कोणताही फरक पडणार नसल्याचे स्पष्ट केले.
महावितरणचे निवृत्त मुख्य अभियंता एम. जी. शिंदे म्हणाले, घरगुती, औद्योगिक, वाणिज्य आणि शेती या तीन प्रकारात विज मागणी विभागली जाते. यात घरगुती विजेची मागणी फक्त १९ ते २० टक्के आहे. औद्योगिक मागणी ४२ ते ४५ टक्के इतकी आहे. तर, वीस टक्के कृषी आणि उर्वरीत वाणिज्य आणि इतर स्वरुपाची मागणी आहे. उद्योग आणि व्यवसायाची मागणी सध्या बंद आहे. म्हणजे मागणीच्या केवळ चाळीस टक्के विद्युत पुरवठा सध्या होत आहे. त्यातही कृषीचा विद्युत सुरुच राहणार आहे. घरातील दिवे सीएफएल आणि एलईडी स्वरुपाचे आहेत. म्हणजेत ३ ते १८ वॅट क्षमतेचे बल्ब आपण घरात वापरत आहे. ते बंद झाल्याने फारसा फरक पडणार नाही. शिवाय घरगुती वीज वापरातही दिव्यांना सर्वात कमी वीज लागते. फ्रिज, एसी, ओव्हन, पंखे या उपकरणांना जास्त वीज लगते.
देशातली सध्याची विद्युत निर्मिती आणि वहन यंत्रणा अत्याधुनिक आहे. मागणी प्रमाणे २५, ५० आणि ७५ टक्के ते शंभर टक्के निर्मिती कमी होऊ शकते. तसेच विद्युत भार वाढला अथवा खूप कमी झाल्यास यंत्रणा आपोआप बंद होते. मागणी असलेल्या भागाकडे वीज वळविली जाते. बंदमुळे विजेची मागणी २३ हजार मेगावॅटवररुन १२-१३ हजार मेगावॅटपर्यंत खाली आली आहे. त्यामुळे घरातील विद्युत दिवे बंद केल्यानंतर मागणी अजून कमी झाल्यास फारसा फरक पडणार नसल्याचे तज्ञांचे मत आहे.
__________________________________________________________________________________________________________________________
विजेची मागणी 24 तास आधी नोंदवली जाते
सरकारी कंपन्या फार कमी विजेची निर्मिती करतात. बहुतांश वीज खासगी कंपन्यांकडून विकत घेतली जाते. नॅशनल ग्रीडच्या माध्यमातून त्याचे वितरण होते. महावितरणला दुसऱ्या दिवशीची मागणी चोवीस तास आधी सांगावी लागते. त्या नुसारच विद्युत निर्मिती कमी-अधिक केली जाते. पंतप्रधानांचे आवाहन लक्षात घेता देशपातळीवरच त्या पद्धतीने विद्युत निर्मितीचे नियोजन होणार आहे.
__________________________________________________________________________________________________________________________
लाईट बंदचा परिणाम होणार नाही : राजीव देव
लॉकडाऊनमुळे गेले सात-आठ दिवस देशातील सर्व व्यवहार बंद आहेत. त्यामुळे केवळ घरगुती आणि कृषी पंप सुरु आहेत. घरगुती लाईट दररोज रात्री बंदच असते. तिच स्थिती नऊ मिनिटांसाठी होईल. सध्या असलेल्या घरगुती मागणीत विद्युत दिवे बंद केल्याने विजेच्या मागणीत खूप मोठी घट होणार नाही. सध्या घरगुती वापरातील दिवे दहा-बारा वॅटचे आहेत. त्यामुळे यंत्रणेत तांत्रिक बिघाड संभवत नसल्याचे महापारेषणचे निवृत्त अधिक्षक अभियंता राजीव देव यांनी सांगितले.
————————————————————————————————–