विशेष प्रतिनिधी
पुणे : तबलिगी जमातशी संबंधित पुण्यातील विविध मशिदीमध्ये राहणार्या टान्झानियाच्या 8 नागरिकांवर कोरोना संबंधीत साथीच्या रोगाचा कायद्याचा भंग केला. तसेच परकीय नागरिक कायद्याचा भंग केल्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे लोक टुरिस्ट व्हिसावर येऊन धार्मिक प्रचार करत होते. त्यामुळे व्हिसा कायद्याचा भंग केल्याचाही गुन्हा त्यांच्यावर नोंद झाला आहे. पुण्यातील कोंढवा, कासेवाडी, मोमीनपुरा, घोरपडी, हडपसर, खडकी येथील मशिदीत ते रहात होते. ते पुण्यात ११ मार्चला आले. त्यांनी स्वत:ला क्वारंटाईन करुन घेणे अपेक्षित असताना त्यांनी ते टाळले. लॉकडाऊनचेही त्यांनी उल्लंघन केले.
दिल्लीतील निजामुद्दीन येथील मरकजमध्ये उपस्थित राहिलेल्यांपैकी अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याचे समजल्यावर पुणे पोलिसांनी शोध सुरु केला होता. त्यात तबलिगी जमातशी संबंधित हे मुळचे टांझानियाचे नागरिक पुण्यातील विविध मशिदी व मदरशांमध्ये रहात असल्याचे आढळून आले. कोविड १९ या साथीच्या रोगाच्या संदर्भात शासनाने पारित केलेल्या लॉक डाऊनच्या विविध आदेशांचे त्यांनी उल्लंघन केले. या प्रकरणी विशेष शाखेचे पोलीस नाईक मयुर सूर्यवंशी यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध कलम १८८ तसेच २६९, २७०, परकीय नागरिक कायदा १४, साथीचा रोग प्रतिबंध कायदा १८९७, महाराष्ट्र कोवीड १९ अंमलबजावणी कायदा कलम २१ नुसार गुन्हा दाखल केला. सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले की, टांझानियाचे नागरिक असलेले हे ८ जण ११ मार्चला पुण्यात टुरिस्ट व्हिसावर आले. शहरातील विविध मशिदीत ते असल्याचे पोलिसांना २३ मार्चला समजले. त्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन त्यांची कोरोना चाचणी घेतली. त्यांना होम क्वारंटाईन रहायला सांगितले.
चौकशी दरम्यान ते टुरिस्ट व्हिसावर आल्याचे व त्यादरम्यान ते धार्मिक प्रचार करीत असल्याचे आढळून आले. हा परकीय नागरिक कायद्याचा भंग असल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांनी साथीचा रोग कायद्याचाही भंग केला आहे. सध्या ते आरोपी असून त्यांना इन्स्टिट्युटशन क्वारंटाईन करण्यात आले आहे.