- मायक्रो बँकिंग क्षेत्रासाठी 50 हजार कोटींची मदत. नाबार्डला आरबीआयने 25 हजार कोटींची मदत जाहीर
- 15 हजार कोटी रुपये भारतीय लघू उद्योग विकास बॅंकेला, तर 10 हजार कोटी एनएचबीला
- रिव्हर्स रेपो रेट 25 बेसिक पॉईंटने कमी करण्यात आला आहे. आता रिव्हर्स रेपो रेट 3.75 टक्के असेल. कर्जे स्वस्त होतील.
- बाजारातील रोकड उपलब्धतेवर विशेष भर
विशेष प्रतिनिधी
मुंबई : चिनी विषाणूच्या संकटाशी सामना करण्यासाठी आर्थिक स्तरांवर मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने रिव्हर्स रेपो दरात कपात केल्यामुळे कर्जे आता आणखी स्वस्त होणार आहेत. जगभर उद्रेक झालेल्या चिनी विषाणूमुळे दुसऱ्या महायुद्धावेळच्या बिकट परिस्थितीसारखी अवस्था सध्या जगाची झाली आहे. जागतिक आर्थिक मंदीची चाहूल अनेक देशांना लागली असून त्याआधीच केंद्र सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
देशात आणि जगातल्या इतर अनेक देशांमध्ये चिनी विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे उद्योग, व्यापार-उदीम बाधीत झाला असून आयात-निर्यातीवर परिणाम झाला आहे. आंतरराष्ट्रीय विमान-जहाज वाहतूक, देशांतर्गत मालवाहतूक थंडावली आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतरही जगातल्या अनेक देशांना आर्थिक मंदीचा फटका बसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अनेक देशांचे विकासदर घसरणार आहेत. सोने प्रति दहा ग्रॅममागे एक हजार रुपयांहून अधिक किमतीने घसरले आहे. क्रुड तेलाच्या किमती खाली आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आरबीआयने काही महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.
Today’s announcements by @RBI will greatly enhance liquidity and improve credit supply. These steps would help our small businesses, MSMEs, farmers and the poor. It will also help all states by increasing WMA limits.
— Narendra Modi (@narendramodi) April 17, 2020
कर्जे स्वस्त करण्यासोबतच बाजारातील रोकड उपलब्धतेवर विशेष भर दिला जाणार आहे. पुढील सूचना येईपर्यंत लाभांश देऊ नये, असे बॅंकांना सांगण्यात आले आहे. दरम्यान, कोरोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटावर उपाय म्हणून बँकेने सलग दुसऱ्यांदा रिव्हर्स रेपो दरात पाव टक्का कपात करीत असल्याचे जाहीर केले. रिझर्व बँकेने केलेल्या घोषणेचे पडसाद कमोडिटी व शेअर बाजारातही उमटले. उच्चांकी भाव पातळीवर गेलेले सोने एमसीएक्स वर सकाळच्या सत्रात प्रति 10 ग्रॅममागे ११०० रुपयांहून अधिकने घसरून ४६,१०२ रुपयांवर, चांदी प्रति किलोमागे ७९५ रुपयांनी घसरून ४३,४६० रुपयांवर आली.
रिझर्व्ह बँकेकडून रिव्हर्स रेपो दरात कपात केल्याने नवा दर ३.७५% झाला आहे. यामुळे कर्जे आणखी स्वस्त होण्याची अपेक्षा आहे. लॉकडाऊनमुळे कंपन्यांना महसुली फटका बसला आहे. त्यामुळे त्यांना वेतन आणि अन्य खर्च भागविण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळेच आर्थिक चालना देण्याची गरज निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर कंपन्या वा इतर उद्योजकांना आधी देण्यात आलेल्या कर्जांना ९० दिवसांच्या मॉरिटोरियम कालावधीसाठी एनपीए निकष लागू होणार नाहीत असेही स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, एनबीएफसी व एमएफआय यांना रोकड तुटवडा जाणवू नये यासाठी विशेष उपायोजना केले असून, टीएलटीआरओ २.० अंतर्गत पहिल्या टप्प्यात ५० हजार कोटी रुपये उपलब्ध होतील.