स्पेन असो की इटली या देशांमध्ये डॉक्टर, नर्स यासारखे हजारो वैद्यकीय कर्मचारीच चीनी व्हायरसने बाधित झाल्याने रुग्णांवर उपचार मिळू शकले नाहीत. त्यामुळे मृतांचा आकडे वाढला हे उदाहरण समोर असतानाही राज्याच्या आरोग्य विभागाकडून महाराष्ट्रातील वैद्यकीय कर्मचार्यांची पुरेशी काळजी घेतली जात नसल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे कौतुक आता पुरे झाले. जनतेच्या जिवाची काळजी घेणार्या वैद्यकीय कर्मचार्यांनाच वाचविण्याची वेळ आता राज्य सरकारच्या दुर्लक्षित कारभारामुळे आली आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे : स्पेन असो की इटली या देशांमध्ये डॉक्टर, नर्स यासारखे हजारो वैद्यकीय कर्मचारीच चीनी व्हायरसने बाधित झाल्याने रुग्णांवर उपचार मिळू शकले नाहीत. त्यामुळे मृतांचा आकडे वाढला हे उदाहरण समोर असतानाही राज्याच्या आरोग्य विभागाकडून महाराष्ट्रातील वैद्यकीय कर्मचार्यांबाबत पुरेशी काळजी घेतली जात नसल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे कौतुक आता पुरे झाले, त्यांनी समोर येऊन वैद्यकीय कर्मचार्यांना वाचविण्यासाठी पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होऊ लागली आहे.
राज्यातील चीनी व्हायरसने बाधित रुग्णांची संख्या तीन हजारांवर पोहोचली आहे. यामध्ये डॉक्टर, नर्स यासारख्या वैद्यकीय कर्मचार्यांचाही समावेश आहे. मुंबईतील भाटिया रुग्णालयात २५ जणांना संसर्ग झाला. जसलोक आणि वोकहार्टमधील प्रत्येकी २१ कर्मचारी बाधित झाले. बॉँबे रुग्णालयात एका कर्मचार्याला संसर्ग झाला. दादरच्या सुश्रुषा रुग्णालयात कोरोनाचा शिरकाव, हिंदूजा, ब्रीच कॅँडी, जगजीवन राम विद्यालय, पार्थ नर्सींग होम, चेंबूरचे साई, मुलुंडचे स्पंदन अशी मुंबईतील अनेक नावे आहेत. पुण्यातील ससून रुग्णालयात तीन नर्स बाधित आहेत. रुग्णालयांंमध्ये चीनी व्हायरसच्या संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. मात्र, त्यासाठी पुरेशी काळजी घेतली जात असल्याचे चित्र दिसत नाही.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये चीनी व्हायरसचे रुग्ण वाढत आहेत. मुंबई, पुणे, मालेगाव हे हॉटस्पॉट बनले आहेत. त्यामुळे दररोज नव्याने येणार्या रुग्णांचे प्रमाण मोठे आहे. त्यांच्यासाठी विलगीकरण कक्ष, अतिदक्षता कक्ष बनविल्याची आकडेवारी सांगितली जात आहे. मात्र, त्यांच्यावर उपचार करणार्या डॉक्टर, नर्स यांच्या सुरक्षेच्या व्यवस्थेकडे मात्र लक्ष दिले जात नसल्याचे दिसत आहे.
चीनी व्हायरस हा संसर्गजन्य असल्याने रुग्णाच्या संपर्कात आलेल्या वैद्यकीय कर्मचार्यांना लागण होण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यासाठी त्यांना वैयक्तिक संरक्षक पोषाख (पीपीई), एन ९५ मास्क यांची गरज असते. मात्र, सगळ्याच शासकीय रुग्णालयांत त्यांचा तुटवडा आहे. सध्या रुग्णांची संख्या जास्त असल्याने रुग्णालयात उपचारासाठी येणार्या प्रत्येकाकडेच संशयित म्हणून पाहायला हवे. मात्र, याबाबत तथाकथिक ‘प्रोटोकॉल’ पाळला जात आहे. रुग्णाचा स्वॅब पाठवून तो पॉझिटिव्ह आल्याशिवाय त्याला विलगीकरण कक्षात ठेवले जात नाही.
त्यामुळे केवळ कोवीड -१९ च्या उपचारात असलेलेच नव्हे तर इतर वॉर्डांमध्ये काम करणारे वैद्यकीय कर्मचारीही धोक्यात आले आहेत. पुण्यातील सोनवणे हॉस्पीटलमध्ये गर्भवती महिला उपचारासाठी आली अणि तिला व्हायरसची बाधा असल्याचे नंतर लक्षात आले. मात्र, येथील डॉक्टर, नर्सच्या वैयक्तिक संरक्षणासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने त्यांना आता क्वारंटाईन करण्याची वेळ आली आहे.
रुग्णालयांमध्ये काम करणार्यांसाठी एन- ९५ मास्क हा सर्वाधिक गरजेचा आहे. मात्र, त्याचा तुटवडा आहे, असल्याचे सांगितले जात आहे. बाजारात मात्र हा मास्क मिळत आहे. अनेक कंपन्या दानशुरतेचे प्रदर्शन करण्यासाठी हजारोच्या संख्येने एन-९५ मास्क खरेदी करून त्याचे वाटप करत आहेत. राज्यात साथरोग नियंत्रण कायदा असल्याने जिल्हाधिकार्यांकडे अधिकार आहेत. गरज नसलेल्यांना एन-९५ मास्क वाटून त्याचा तुटवडा निर्माण करणार्यांवर ते कारवाई करू शकतात. परंतु, अशा प्रकारची कारवाई अद्याप तरीही राज्यात कोठेही झाल्याचे उजेडात आलेले नाही. पीपीई किटचा तुटवडा असल्याने अनेक ठिकाणी डॉक्टरांनी रेनकोटचा वापर संरक्षक पोषाख म्हणून केल्याच्या बातम्या आल्या. त्यावर राज्य शासनाने कार्यवाही केली नाही.
स्पेनमध्ये तब्बल २७ हजार तर इटलीमध्ये ९ हजार डॉक्टर आणि नर्सना चीनी व्हायरसची लागण झाली. त्यामुळे वैद्यकीय उपचाराची यंत्रणाच कोलमडून पडली. रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले. महाराष्ट्रापुढे हा धडा आहे. मात्र, त्यापासून बोध घेतलेला नाही. आरोग्य मंत्री राजेश टोपे सातत्याने नागरिकांना उपदेशाचे डोस पाजत आहेत. चिनी व्हायरसविरुध्द लढाईसाठी केलेल्या उपायांची माहिती देत आहेत. परंतु, प्रत्यक्षात जे रुग्णालयांत लढत आहेत, त्यांच्याकडे मात्र लक्ष नाही. भविष्यात यातून गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.