एका “मौत के सौदागर”ने गुजरातची 2007 ची निवडणूक फिरली आणि एक संपूर्ण करिअर “घडले”, पण मग त्याला प्रत्युत्तर म्हणून दिलेल्या “मूर्खों के सरदार”ने दुसरी निवडणूक फिरेल का?? आणि कायमचे बिघडलेले करिअर आता तरी सुधारेल का??, हा सवाल तयार झाला आहे. Will Congress be able to create favorable turn of PM Modi’s criticism of rahul gandhi as knight of stupids??
हा संघर्ष तसा खूप जुना आहे. अगदी 2002 पासूनचा आहे. ज्यावेळी नरेंद्र मोदी नावाच्या एका संघ स्वयंसेवकाची आणि भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसाची कारकीर्द गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून सुरू झाली होती. त्या 2002 मध्ये गोध्रा हत्याकांड घडले. त्यानंतर गुजरात दंगली उसळल्या आणि लिबरल जगताची मोदी बदनामी मोहीम सुरू झाली. या बदनामीचा कळस गाठला होता, तो “मौत के सौदागर” या टीकेने.
2007 च्या निवडणुकीत गुजरात विधानसभा निवडणुकीत तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी अहमदाबाद मधल्या मोटेरा स्टेडियम मध्ये झालेल्या काँग्रेसच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना उद्देशून “मौत के सौदागर” अशी टीका केली आणि निवडणूक अक्षरश: फिरली होती. मोदींनी त्या टीकेचा इतका कौशल्याने चपखल वापर करून घेतला की, 2007 नंतर 2023 पर्यंत गुजरात मध्ये काँग्रेस पुन्हा सत्तेचे तोंड पाहू शकली नाही, इतकेच नाही, तर मोदींचे स्वतःचे करिअर एवढे बहरले की, ते त्यानंतर गुजरातचे दोन टर्म मुख्यमंत्री आणि त्यानंतर दोन टर्म पंतप्रधान राहिले!!
अर्थात मोदींवरची टीका राजकीय जरी असली तरी एकूण व्यक्तिमत्त्वावर पूर्ण अन्याय करणारीच होती. कारण कोणताही राजकीय नेता इतक्या सहजपणे “मौत के सौदागर” ठरविता येत नाही, हे इंदिरा हत्येनंतर झालेल्या शीख हत्याकांडात राजीव गांधींच्या बाबतीत सिद्ध झाले आहे. पण तरी देखील सोनिया गांधींनी त्यांच्या राजकीय कॅल्क्युलेशन नुसार मोदींवर “मौत के सौदागर” म्हणून टीका केली. पण त्यांचे कॅल्क्युलेशन एवढे चुकले की, ते काँग्रेसला खड्ड्यात घेऊन गेले आणि मोदींना शिखरावर नेऊन ठेवते झाले.
मोदींनी “मौत के सौदागर”ला त्यावेळी कधी तोंडी उत्तर दिले नाही. गुजरातच्या जनतेने आणि नंतर संपूर्ण भारत असल्या जनतेने मतदान यंत्राद्वारे ते कायम उत्तर दिले.
पण तब्बल 16 वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मध्य प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत बैतूल मध्ये “मौत के सौदागर”ला “मूर्खों के सरदार” म्हणून प्रत्युत्तर दिले आणि काँग्रेसचे नेते या “मूर्खों के सरदार” या राजकीय वाक्प्रचाराला आपल्या प्रचाराचा मुख्य मुद्दा बनवू पाहत आहेत. राहुल गांधींनी मध्य प्रदेशातल्या प्रचार सभेत देशात सगळीकडे “मेड इन चायना” दिसते. तुमचा मोबाईल फोन, तुमचा शर्ट, तुमचा बूट यावर “मेड इन चायना” लिहिले आहे. काँग्रेस सत्तेवर आली, तर काँग्रेसला “मेड इन मध्य प्रदेश” करायचे आहे, असे भाषण केले होते.
त्याच मुद्द्यावरून राहुल गांधींना ठोकताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी “मूर्खों के सरदार” हा राजकीय वाक्प्रचार वापरला. या मूर्खांच्या सरदाराला भारताची किती प्रगती झाली आहे, हे माहितीच नाही. त्याने कोणता असा विदेशी चष्मा लावलाय की ज्यामुळे भारताची प्रगती त्याला दिसत नाही, हे समजत नाही. पण ज्या मोबाईलला हा मुर्खांचा सरदार “मेड इन चायना” म्हणतो, तो प्रत्यक्षात गेल्या काही वर्षांपासून भारतात बनू लागला आहे. भारतात तब्बल 3.50 लाख कोटींचे मोबाईल फोन बनत आहेत. त्यातले 1 लाख कोटींचे मोबाईल भारत निर्यात करतो आहे. ज्यावेळी काँग्रेसची राजवट होती, त्यावेळी भारतात फक्त 20000 कोटी रुपयांचे मोबाईल बनत होते, अशी घणाघाती टीका पंतप्रधान मोदींनी केली आणि नेमका हाच मुद्दा काँग्रेस नेत्यांनी उचलला आहे. “मूर्खों के सरदार” हे शब्द देशाच्या पंतप्रधानांच्या तोंडी शोभत नाहीत, अशी टीका काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, कमलनाथ आणि बाकीच्या नेत्यांनी सुरू केली आहे. याचा अर्थ काँग्रेसला “मूर्खों के सरदार” हा मुद्दा निवडणुकीत पूर्णपणे चालवायचा दिसत आहे.
पण यातली एक राजकीय विसंगती अशी की, ज्यावेळी काँग्रेसचे तिन्ही मुख्यमंत्री राहुल गांधींना आपल्या राज्यामध्ये प्रचाराला येण्यास वेगळ्या पद्धतीने “प्रतिबंध” करू पाहत आहेत, नेमका त्याचवेळी मोदींनी “मूर्खों के सरदार” हा वाक्प्रचार वापरून राहुल गांधींना प्रचाराच्या केंद्रस्थानी आणून ठेवले आहे. त्यामुळे आपोआपच काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना आता राहुल गांधींनाच प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवावे लागून राहुल गांधींवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर द्यावे लागत आहे. ही मोदींची राजकीय चतुराई आहे.
पण तरी देखील सोनिया गांधींनी मोदींवर केलेल्या “मौत के सौदागर” या टीकेचा मोदींना जसा लाभ झाला, तसा लाभ राहुल गांधींना “मूर्खों के सरदार” या टीकेचा होईल का??, याविषयी दाट शंका वाटते. कारण ज्या पद्धतीने मोदींचे राजकीय कौशल्य, भाजपचे संघटन आणि भाजपची प्रचाराची रणनीती या तिहेरी धोरणातून मोदींना आणि भाजपला यश मिळाले, तसे तिहेरी धोरण काँग्रेसमध्ये आढळत नाही. उलट आजही काँग्रेसमध्ये जो विस्कळीतपणा दिसतो, त्यामुळे फक्त मोदींच्या टीकेचे पडसाद किरकोळ एक-दोन वक्तव्यांतून समोर येतील आणि नंतर “मूर्खों के सरदार” हा किताब जसाच्या तसा चिकटेल अथवा विरून जाईल, अशी शक्यता दाट आहे!!
आता हे राहुल गांधींच्या कौशल्यावर अवलंबून आहे की, आपण “मूर्खों के सरदार” नसून “हुशारों के सरदार” आहोत हे सिद्ध करायची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली आहे!!, राहुल गांधी तसे सिद्ध करू शकतील का??… ही शंका अधिक दाट आहे!!
Will Congress be able to create favorable turn of PM Modi’s criticism of rahul gandhi as knight of stupids??
महत्वाच्या बातम्या
- “काँग्रेसने आदिवासींची कधीच पर्वा केली नाही, तर भाजप…” ; मोदींचं विधान!
- मतस्वातंत्र्याच्या नावाखाली दहशतवादाला चिथावणी देऊ नका; कॅनडियन पंतप्रधानांना भारताने सुनावले!!
- गोविंद बागेतली दिवाळी पूर्वार्धात न आलेल्या अजितदादांभोवती फिरली; उत्तरार्धात शरद पवारांच्या जातीच्या चर्चेभोवती फिरली!!
- 33 % महिला आरक्षण ताबडतोब लागू करण्याची मागणी करण्यात काँग्रेस पुढे, पण प्रत्यक्ष उमेदवारी देण्यात मागे!!