राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर बहुतेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील किंवा काँग्रेसच्या जवळ जातील, असे सूतोवाच केले. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. “पवारांनी अखेर शरणागती पत्करली”, “पवारांना स्वतःच्या मुलीचे राजकीय ओझे जड झाले”, असे राजकीय पर्सेप्शन महाराष्ट्रात तयार झाले. सर्व राजकीय पक्षांनी पवारांच्या वक्तव्याची वेगवेगळ्या प्रकारे खिल्ली उडवली. मराठी माध्यमांनी त्याला विलीनीकरणाचे नाव दिले, तरी प्रत्यक्षात ती शरणागती होती. Will Congress accept sharad pawar’s proposal of merger of regional parties??
पण त्या पलीकडे जाऊन पवारांच्या वक्तव्यामुळे जो महत्त्वाचा मुद्दा उद्भवला आणि समोर आला, त्यावर मात्र कोणी बोलायला तयार नाही. तो मुद्दा म्हणजे, शरद पवारांच्या वक्तव्यातून काँग्रेसला जो “राजकीय धोका” उत्पन्न झाला म्हणजे शरद पवार ज्या प्रादेशिक पक्षांचे विलीनीकरण काँग्रेसमध्ये करू इच्छितात, त्या प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांच्या इच्छा आकांक्षांचे ओझे काँग्रेसला पेलवेल का??, हा तो धोकादायक सवाल आहे.
यात हिशेब साधा आहे. मूळात प्रादेशिक पक्ष निर्माण का झाले?? ते का वाढले??, ते का फुलले आणि फळले??, तर त्याचे उत्तर काँग्रेसमधल्या सध्याच्या नेतृत्वाच्या राजकीय आकुंचनात आहे. काँग्रेस मधले प्रस्थापित नेते प्रादेशिक नेत्यांची “अस्मिता” जपत नव्हते, तथाकथित स्वाभिमान जपत नव्हते, त्यांना त्यांच्या त्यांच्या राज्यांमध्ये राजकीय करण्याची मोकळीक देत नव्हते, म्हणून तर काँग्रेस मधून फुटून प्रादेशिक नेते बाहेर पडले आणि त्यांनी प्रादेशिक पक्ष स्थापन केले.
याचे सर्वांत मोठे उदाहरण तर स्वतः शरद पवारच आहेत. पण त्यांच्या पाठोपाठ किंवा त्यांच्या आगे मागे ममता बॅनर्जी, जगन मोहन रेड्डी, चंद्रशेखर राव आदी नेत्यांनी काँग्रेसने मधून बाहेर पडून स्वतःचे पक्ष स्थापन केले आणि स्वतःची राज्य स्वबळावर चालवली. अपवाद फक्त शरद पवारांचा होता. शरद पवारांनी स्वाभिमानाचे नाव देऊन प्रादेशिक पक्ष काढला खरा, पण काँग्रेस बरोबर सत्तेच्या वळचणीला जाऊन बसण्याखेरीज पवारांना स्वबळावर महाराष्ट्राची सत्ता मिळवता आली नाही. बाकी सगळ्या नेत्यांनी आपापल्या राज्यांमध्ये स्वबळावर सत्ता मिळवून स्वबळावर राबवून दाखवली. पण पवारांना ते महाराष्ट्रात जमले नाही.
… आणि आता जेव्हा सुप्रिया सुळे यांचे राजकीय भवितव्य पूर्णपणे लटकले आहे, त्यावेळी पवारांनी प्रादेशिक पक्षांच्या विलीनीकरणाचे वक्तव्य केले. पण ते विलीनीकरणाचे वक्तव्य त्यांच्या दुसऱ्याच दिवशी अंगलट आल्यानंतर त्यावरून त्यांनी घुमजाव देखील केले. आपण असे बोललोच नव्हतो. आपण प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या जवळ येतील आणि अधिक एकसंधतेने काम करतील एवढेच वक्तव्य केले होते, असा खुलासा पवारांनी आज केला.
परंतु मूळात आपल्या आधीच्या वक्तव्यातून पवारांना जो राजकीय परिणाम साधायचा होता तो साधलाच गेला. महाराष्ट्रात त्यामुळे शिवसेनेविषयी जो संभ्रम निर्माण करायचा होता, तो झालाच. त्यामुळे पवारांनी आज जरी घुमजाव केले, तरी पवारांच्या मूळ विचाराला किंवा वक्तव्याला फारशी बाधा पोचली नाही.
ज्या तथाकथित स्वाभिमानाच्या राजकारणासाठी पवारांनी स्वतःचा राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा पक्ष काढला, त्याचे राजकीय प्रयोजन संपुष्टात आले आहे. एकीकडे पवारांचे राजकारण आकुंचन पावत आहेत आणि त्याचवेळी सुप्रिया सुळे यांचे राजकीय बस्तान बसायचे आहे, ते पवारांना अजून आपल्या मनासारखे बसवता आलेले नाही म्हणून तर विलीनीकरणाच्या नावाखाली हा शरणागतीचा खेळ खेळायची पवारांवर वेळ आली आहे. फक्त त्याला विलीनीकरणाचे गोड गुलाबी साखर मिश्रित नाव देण्यात आले आहे.
सुप्रिया सुळे या स्वतंत्रपणे प्रादेशिक पक्ष चालवतील अशी अवस्था शिल्लक राहिली नसल्याने पवारांनी प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील अशा वक्तव्याची हूल दिली. भले पवारांनी तशी हूल दिली असेल, पण काँग्रेसने पवारांच्या पक्षाची किंवा बाकीच्या प्रादेशिक पक्षांची विलीनीकरण करून घेण्याची तयारी मान्य केली पाहिजे ना?? इथेच खरी राजकीय मेख दडली आहे. भले पवार किंवा बाकीचे प्रादेशिक नेते काँग्रेसमध्ये स्वतःचे पक्ष विलीन करायला उतावळे झाले असतील, पण काँग्रेसचे नेते त्यांचे स्वपक्षात विलीन करून घ्यायला तेवढे उतावळे झालेत का?? किंवा काँग्रेसला त्यांची तेवढी गरज उरली आहे का?? आणि त्याही पलीकडे जाऊन प्रादेशिक नेत्यांची राजकीय मिरासदारी सहन करण्याची काँग्रेसच्या नेत्यांची तयारी आहे का??? हे मूलभूत प्रश्न पवारांच्या एका वक्तव्यामुळे तयार झाले आहेत.
खरंतर काँग्रेसमध्येच पक्ष संघटनेचे ओझे राहुल गांधींना जड झाले आहे. संपूर्ण देशभर 6200 किलोमीटर फिरून भारत जोडो न्याय यात्रा काढून राहुल गांधींना राजकीय यशाची खात्री देता येत नाही. त्यामुळे काँग्रेस संघटनात्मक पातळीवर वाढवून यशस्वी होत नाही. अशावेळी आपल्याच संघटनेचे बळकटीकरण करण्याऐवजी दुसऱ्या पराभूत प्रादेशिक पक्षांच्या संघटना आपल्या पक्षात विलीन करून घेऊन काँग्रेसची डोकेदुखी वाढेल की काँग्रेसची संघटना वाढेल??, हा कळीचा सवाल आहे.
कारण प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांनी कितीही काँग्रेसमध्ये विलीन होण्याची तयारी दाखवली तरी त्यांच्या प्रादेशिक अस्मिता आणि तथाकथित स्वाभिमान यांची धार कमी होणे कठीण आहे. त्यामुळे प्रादेशिक नेते स्वतःची अस्मिता आणि स्वतःचा स्वाभिमान जसाच्या तसा ठेवून जर काँग्रेसमध्ये परतणार असतील, तर्फे काँग्रेस संघटनेच्या ताकदीचे शोषण करून आपला तथाकथित स्वाभिमान पोसत राहतील, हे न समजण्याइतपत काँग्रेसचे नेते दूधखुळे नाहीत. पवारांसकट सगळ्या प्रादेशिक नेत्यांचे बारसे जेवले आहेत. काँग्रेस नेत्यांना प्रादेशिक नेत्यांचे कथित स्वाभिमान कुरवाळण्याची बिलकुल गरज नाही. त्यामुळे पवारांच्या वक्तव्यानुसार प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन व्हायला कितीही उतावळे असले तरी, काँग्रेस नेते त्या प्रादेशिक पक्षांना आणि त्यांच्या नेत्यांना आपल्या पक्षात विलीन स्व पक्षाचे शोषण करून घेण्याइतपत दूधखुळे नाहीत. पण तसा दूधखुळेपणा केला, तर काँग्रेसला लोकसभा निवडणुकीतील पराभवापेक्षा जास्त मोठी किंमत भविष्यात चुकवावी लागेल.