पृथ्वीच्या कवचात कोणत्याही कारणाने क्षोभ उत्पन्न होऊन तेथील खडकांना एकाएकी धक्का बसला म्हणजे धक्क्याच्या स्थानापासून कंपने निर्माण होऊन ती सभोवार पसरतात, त्यालाच भूकंप म्हटले जाते. भूकंपाचे तरंग पृथ्वीच्या पृष्ठावरून प्रवास करताना जमीन हादरते. मूळ धक्क्याचा जोर व उगमस्थानापासूनचे अंतर यांनुसार हे हादरे निरनिरळ्या ठिकाणी कमीअधिक प्रमाणात जाणवतात. रस्त्यावरून एखाद्या अवजड ट्रॅक्टर किंवा मालवाहू ट्रक वेगाने जात असताना आजूबाजूची जमीन व घरे किंचित पण स्पष्ट कळून येण्याइतक्या प्रमाणात कंप पावतात. सहज सर्वांना जाणवेल इतक्या मोठ्या प्रमाणात जमीन कंप पावण्यासाठी काही किमान तीव्रतेचा अकस्मात धक्का बसावा लागतो. What causes earthquakes in the belly of the earth?
असे धक्के बसण्याची दोन प्रमुख कारणे आहेत. त्यापैकी सहज कळण्याजोगे कारण ज्वालामुखी क्रिया हे आहे. स्फोटक उद्रेक होत असताना त्यातील वाफ, तप्त पदार्थ आणि शिलारस उफाळून बाहेर येतात तेव्हा त्या धक्क्यामुळे आजूबाजूचा भूभाग हादरतो; पण ज्वालामुखीचा कितीही महास्फोटक उद्रेक झाला, तरी त्याच्यामुळे उद्भवणाऱ्या भूकंपाची तीव्रता आणि भूकंप जाणवण्याचे क्षेत्र अगदी मर्यादित म्हणजे ज्वालामुखीच्या सभोवती काहीशे चौरस किमी. इतकेच असते. ज्यांची नोंद फार मोठ्या क्षेत्रात होते, अशा बहुसंख्य भूकंपाचे कारण वेगळे असते. भूकवचात चालू असणाऱ्या हालचालींमुळे खडकांच्या थरांत विषम ताण निर्माण होत असतो व हा ताण असह्य झाला की, खडकांचे थर भंग पावून पुढेमागे वा खालीवर सरकतात. ही विभंग क्रिया अकस्मात घडून आल्यामुळे धक्का बसून त्याचा हादरा साऱ्या जगभर नोंदविला जातो. ताण साचत राहून अखेर खडकांमध्ये विभंग प्रक्रिया घडून येते या सिद्धांताला स्थितिस्थापक प्रतिक्षेप सिद्धांत म्हणतात.
सॅन फ्रॅन्सिस्को येथे १९०६ साली झालेल्या भूकंपामुळे पृष्ठभागावर एकाच भूमिरूपाच्या दोन शकलांमध्ये पडलेल्या अंतराचा अभ्यास करुन एच्. रीड या भूकंपशास्त्रज्ञांनी या सिद्धांताला पुष्टी दिली.