आजूबाजूच्या वातावरणाचे ज्ञान होण्यासाठी सारखी उघडझाप करणाऱ्या डोळ्यांच्या हालचालींमुळे स्पर्शाची अनुभूती प्रभावित होत असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. न्यूयॉर्क विद्यापीठाच्या मानसशास्त्र आणि मज्जातंतूशास्त्र विभागात झालेले हे संशोधन नुकतेच नेचर कम्युनिकेशन या शोधपत्रिकेत प्रकाशित झाले आहे. डोळ्यांच्या हालचालींमुळे स्पर्शिका उत्तेजनांमधील फरक ओळखण्याच्या मानवी क्षमतेवर प्रभाव पडतो. तसेच, स्पर्शिका उत्तेजनामुळे डोळ्यांच्या हालचालींवरही दडपण येते. हे अभ्यासण्यासाठी शास्त्रज्ञांनी मानवी हालचालींवर नियंत्रण ठेवणारा मेंदूतील विशिष्ट भाग आणि मज्जातंतू यांच्यामध्ये स्पर्शाने आणि डोळ्यांच्या हालचालींमुळे होणारा परिणाम तपासला. यातून मानवी आकलनशक्ती, अनुभूती आणि प्रतिक्रिया यांच्या दरम्यान एक आश्चपर्यकारक दुवा स्पर्शिका उत्तेजना आणि डोळ्यांच्या हालचालींतून स्पष्ट होत असल्याचे पुढे आले. त्वचेच्या स्पर्शाचा डोळ्यांशी असलेला सहसंबंध तपासण्यासाठी शास्त्रज्ञांनी कंपनांचा आधार घेतला. The role of touch and eye symbiosis is important in perfecting the universe
त्यासाठी प्रयोगात सहभागी झालेल्या व्यक्तींना जास्त वारंवारिता आणि कमी वारंवारिता असलेल्या कंपनांमध्ये फरक ओळखायला सांगितले. सहभागी व्यक्तींच्या बोटांना कंपने उत्पन्न करणारे यंत्र लावण्यात आले. तसेच डोळ्यांतील अगदी सूक्ष्म हालचाली टिपण्यासाठी संगणकीय प्रणालीचा वापर करण्यात आला. प्रयोगात सहभागी लोकांना समोरच्या संगणकाच्या पडद्यावर लक्ष केंद्रित करायला लावले. त्यानंतर कंपने सुरू करण्याची सूचना दिली. ही सूचना दिल्यानंतर डोळ्यांच्या हालचालींचा अभ्यास शास्त्रज्ञांनी केला. प्रयोगात समोरच्या पडद्यावर एकटक पाहायचे होते. त्यामुळे तुलनेने कमी वारंवारितेच्या कंपनांचे अनुमान बांधताना सहभागी व्यक्तींना कसरत करावी लागली. अशा वेळी त्यांच्या डोळ्यांच्या हालचालीवर दडपण येत, तसेच दोन कंपनांमधल्या वेळेतही डोळ्यांच्या हालचाली प्रभावित होत. या प्रयोगातून स्पर्श आणि डोळ्यांच्या हालचाली परस्परांशी संबंधित असल्याचे लक्षात आले. तसेच, सराव वाढत नेल्यास कंपनांतील फरक ओळखण्याची क्षमताही वाढत गेल्याचे शास्त्रज्ञांच्या लक्षात आले. भौतिक जगाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त करण्यासाठी आपल्या पंचेंद्रियांमध्ये आत्मिक सहसंबंध असल्याचे यातून स्पष्ट होते. मानवी संवेदना, जाणिवा आणि त्यातून उत्पन्न होणारी कृती अशा भावविश्वाला परिपूर्ण करण्यात स्पर्श आणि डोळ्यांचे हे सहजीवन महत्त्वपूर्ण ठरते.