भविष्यातले युग हे यंत्रमानवांचे युग आहे असे म्हणतात. सर्व प्रकारची कामे न कंटाळता, कुशलपणे आणि अतिशय वेगात करणारे यंत्रमानव माणसाने तयार केले आहेत. धोक्याच्या जागी व अशक्य वाटणारी कामे हे यंत्रमानव अगदी सहजपणे करू शकतात. मात्र काम कोणते करावयाचे याची माहिती यंत्रमानवातील संगणकाला द्यावी लागते. जर यंत्रमानव विचार करू लागला तर त्याला अशी माहिती देण्याची गरज राहणार नाही. माणसाच्या मेंदूइतकाच प्रगल्भ आणि बुध्दीवान संगणक तयार झाला तर असे यंत्रमानव तयार होऊ शकतीलही. शास्त्रज्ञ असा संगणक बनविण्याचा आणि यंत्रमानवाला स्वयंपूर्ण बनविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत. The relatively small brain has a network of 100 billion neurons
यदाकदाचित हे शक्य झाले तर यंत्रमानव माणसापेक्षा वरचढ होऊन माणसालाच गुलाम बनवेल की काय अशी भीती सर्वसामान्यांना वाटू लागली आहे. सुदैवाने माणसाचा मेंदू व बुध्दी ही सध्या असणाऱ्या सर्वात आधुनिक व प्रगत संगणकाच्या दृष्टीनेदेखील फार मोठी व अतर्क्य गोष्ट आहे. त्यामळेच मेंदूच्या अभ्यासावर आता आपल्या शास्त्रज्ञांनी लक्ष केंद्रीत केले आहे.
माणसाच्या मेंदूचा आकार लहान असला तरी त्यात असंख्य म्हणजे सुमारे १०० अब्ज न्यूरॉन किंवा मज्जापेशींचे जाळे असते. प्रत्येक मज्जापेशीत संदेश आणणारा डेन्ड्नइट व संदेश सोडणारा अॅक्झान असे तंतू असतात. एका पेशीचा डेन्ड्नइट दुसऱ्याच्या अॅक्झान जवळ असतो. सेकंदास हजार एवढ्या सूक्ष्म विद्युतलहरी त्यातून प्रवास करतात. एक मज्जापेशी एकावेळी दोन लाख मज्जापेशींशी संपर्क साधू शकते. या संपर्कालाच मानवी बुध्दीच्या दृष्टीने फार महत्व आहे.
मेंदूमध्ये कोठले कार्य कोठे चालते याबद्दल माणसाला ज्ञान झाले असले तरी ते कसे चालते याबद्दलचे गूढ अजूनही कायम आहे. संगणकाची रचना फार वेगळी असते. स्मृती, गणित, नियंत्रण, माहिती ग्राहक व दर्शक हे भाग वेगवेगळे असतात. शून्य आणि एक या सांकेतिक भाषेत संगणकाचे सर्व कार्य चालते. एकावेळी एकच क्रिया संगणक करू शकतो. याउलट मानवी मेंदूत संवेदना ग्रहण कृती व विचार करणे एकाच वेळी चालू असते.