कोणतीही कलाकृती ही कलाकाराच्या डोक्या त तयार झालेली असते, असे प्रख्यात शिल्पकार मायकेल अँजेलो यांनी म्हटले आहे. एका अर्थी ते खरेच आहे. या वाक्यासचा मेंदूविज्ञानाला अभिप्रेत असलेला अर्थ महत्त्वाचा आहे. मेंदूतील विविध जोडण्यांमुळे कलेची निर्मिती होत असते. प्रत्येकालाच या क्षमता असतात असे नाही, पण ज्याच्यात आहेत त्यांना योग्य वातावरण म्हणजे नर्चर संगोपन मिळाले तर या पेशींच्या जोडण्यांचा बाह्या विष्कार होतो. पण पेशींच्या जोडण्या बळकट करण्यासाठी प्रयत्न लागतातच. गायकाला रियाज करावा लागतो, चित्रकाराला चित्रे काढावी लागतात, लेखकाला लिहीत राहावे लागते. प्रयत्न केले नाहीत तर मिळालेल्या क्षमता गमवाव्या लागतात. The brain contains a map of the body
यूज इट ऑर लूज इट असा हा प्रकार. कारण मेंदू लवचिक असतो. काही सर्जनशील माणसे विक्षिप्त असतात, असेही आपण पाहतो. हा विक्षिप्तपणासुद्धा मेंदूतील जोडण्यांमुळे त्यांना मिळालेला असतो असे आता अभ्यासाअंती सिद्ध झालेले आहे. काहीही असले तरी त्याच्यात अतींद्रिय काही नसते, हा मुद्दा महत्त्वाचा. मेंदूला चिकणमातीसारखा हवा तो आकार देता येतो, पुन्हा बदलता येतो, या गुणधर्माला प्लास्टिसिटी म्हणतात. मराठीत लवचिकपणा. मेंदूचा आकार तीच क्रिया पुनःपुन्हा करून बदलता येतो. हे प्रौढ मेंदूतही घडते. याचा अर्थ मेंदूचा ढोबळ आकार बदलत नाही, तर सूक्ष्म स्तरावर मेंदूतील पेशीच्या जोडण्यांची संख्या वाढते. सूक्ष्म स्तरावर मेंदूचा आकार बदलतो. मेंदूच्या कार्यात बदल होतो. त्यायोगे माणसाच्या वर्तनात बदल होतो. माणसांच्या क्षमतांमध्येही थोडाफार बदल होऊ शकतो.
मेंदूमध्ये शरीराच्या अवयवाचे प्रतिनिधित्व करणारे नकाशे असतात. एखादा बोटाने वाद्य वाजवणारा कलावंत असतो, तो रियाज करतो. त्याच्या मेंदूतील अवयवांच्या नकाशात त्याच्या बोटांनी जास्त जागा व्यापलेली असते. फुटबॉलपटूच्या मेंदूच्या नकाशात पावलाने जास्त जागा व्यापलेली असते. लंडनमधील टॅक्सीे ड्रायव्हरच्या मेंदूचे स्कॅनिंग करून पाहिले तेव्हा रस्त्यांची स्मृती साठवण्याची मेंदूतील जागा ही सामान्य माणसाच्या मेंदूतील अशा जागेपेक्षा मोठी होती, असे आढळले. यालाच मेंदूची प्लास्टिसिटी म्हणतात.