नाशिक : गेल्या तीन-चार दिवसांमध्ये ठाकरे परिवार आणि पवार परिवार यांच्यातल्या ऐक्य आणि बैठकांच्या बातम्यांची भरमार मराठी माध्यमांनी केली, पण असल्या एकी आणि बैठकांच्या कोरड्या बातम्या, प्रत्यक्षात भाजप प्रणित सरकारला धक्काही लावता येत नसल्याच्या निराशा!! यापेक्षा या बातम्यांचे स्वरूप कुठलेही वेगळे नव्हते.
वास्तविक ठाकरे आणि पवारांच्या कुटुंबांच्या एकत्रीकरणाच्या आणि बैठकांच्या एवढ्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या की, जणू काही ठाकरे आणि पवार या दोन दिग्गज घराण्यांनी महाराष्ट्राचे सरकार हलवून हलवून खिळखिळे केले आणि ते उखडून फेकून दिले, अशी वातावरण निर्मिती झाली असती. परंतु प्रत्यक्षात तसे काहीच घडले नाही. कारण महाराष्ट्रातले भाजप प्रणित सरकार उखडून फेकणे तर दूरच, साधे हलवायची देखील संख्यात्मक ताकद ठाकरे आणि पवार या दोन दिग्गज नेत्यांकडे उरलेली नाही.
वास्तविक गेल्या १५ दिवसांमध्ये अजित पवार आणि शरद पवार यांच्या तब्बल ४ बैठका झाल्या. त्या कधी बंद खोलीत झाल्या, तर कधी मोठ्या हॉलमध्ये झाल्या. त्यामुळे आता काका – पुतणे एकत्र येणार आणि महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजवणार, अशा बातम्या मराठी माध्यमांनी चालविल्या. पण प्रत्यक्षात रयत शिक्षण संस्था, साखर संकुल, अजित पवारांच्या मुलाच्या साखरपुडा यांच्या बैठकांमध्ये किंवा कार्यक्रमांमध्ये शरद पवार आणि अजित पवार भेटले. त्यापलीकडे दोघांमध्ये कुठली खासगी चर्चा झाली असली, तरी त्याचा राज्य सरकारवर तसूभरही परिणाम झाला नाही. खुद्द अजित पवारांनी त्यासंदर्भात खुलासा देखील केला.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आणि रयत शिक्षण संस्थेत शरद पवार अध्यक्ष आणि अजित पवार कार्यकारिणीचे सदस्य असल्यामुळे ते एकत्र येतात. संस्थात्मक कामांच्या बैठकांमध्ये सहभागी होतात. त्यापलीकडे दुसरे काही घडत नाही, असे स्वतः अजित पवार म्हणाले, तरी त्यावर मराठी माध्यमांनी विश्वास न ठेवता काका – पुतणे एकत्र येऊन महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजवणार अशा बातम्यांची भरमार केली, पण प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या राजकारणात पेल्यातले वादळ देखील पवार काका – पुतणे उद्भवू शकले नाहीत. पवारांच्या ६० वर्षांच्या कारकिर्दीत इतिहासात त्यांची एवढी राजकीय गलितगात्र अवस्था कधीही झाली नव्हती.
जे पवार कुटुंबाचे, तेच ठाकरे बंधूंचे!! राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांच्यापुढे एका मुलाखती द्वारे टाळीसाठी हात पुढे केला. उद्धव ठाकरेंनी लगेच राज ठाकरेंना प्रतिसाद दिला. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार आणि महाराष्ट्राचे राजकारण 360° मध्ये बदलणार, असा आव मराठी माध्यमांनी आणला. भर उन्हाळ्यात ठाकरे बंधूंनी व्हॅलेंटाईनचे गुलाब एकमेकांना देण्यासाठी हात पुढे केले, पण प्रत्यक्षात त्या गुलाबाच्या दांड्यांना टोकदार काटे फुटलेलेच दिसले. दोन्ही बाजूच्या सैनिकांनी दोन बंधूंच्या एकत्रीकरणात किती अडथळे आहेत हे उघडपणे दाखवून दिले. ठाकरे बंधूंचे ऐक्य करण्याचा निर्णय केवळ ठाकरे घराण्यापुरता मर्यादित उरलेला नाही, तर दोन्ही बाजूच्या सैनिकांचे वेगवेगळे “इंटरेस्ट” त्यातून “क्लॅश” होतात हे राजकीय सत्य त्यातून समोर आले.
पण त्या पलीकडे जाऊन ठाकरे आणि पवार यांच्यासारखे दोन दिग्गज नेते वारंवार एकत्र बैठका घेऊन किंवा एकीच्या माध्यमी चर्चा घडवून महाराष्ट्राचे राजकारण आता हलवू शकत नाहीत. कारण त्यांची तेवढी ताकदच उरलेली नाही. हे ठाकरे + पवारांसाठी निराशाजनक जनक असलेले सत्य या कोरड्या बातम्यांमधून समोर आले.
Thackeray + Pawar lost capacity to run the Maharashtra politics
महत्वाच्या बातम्या