जगभरात गेल्या वर्षापासून थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणुपासून बचाव करण्यासाठी मास्कचा वापर केला जात आहे. मात्र, सामाजिक चिंता असणाऱ्यांना मास्क घातल्यामुळे कोरोना साथीदरम्यान किंवा नंतर अधिक त्रासातून जावे लागते, असा निष्कर्ष आंतरराष्ट्रीय संशोधकांनी काढला आहे. कॅनडातील वॉटर्लू विद्यापीठातील मानसशास्त्र विभाग आणि मानसिक आरोग्य संशोधन आणि उपचार केंद्राने हे संशोधन केले. संशोधकांना तीन घटकांमुळे मास्कशी संबंधित सामाजिक चिंताविकारात वाढ होत असल्याचे आढळले. सामाजिक निकषांबाबत अतिसंवेदनशीलता, सामाजिक व भावनिक संकेत शोधण्यातील पक्षपात आणि सुरक्षित वर्तन म्हणून स्वत:ला लपविण्याची वृत्ती यांचा त्यात समावेश आहे. Science Destinations: Corona Rescue Masks Increase Social Anxiety
आपण कोरोना साथीतून काहीसे बाहेर पडलो आहोत. मात्र, आपले भविष्य पूर्वीपेक्षा अधिक अनिश्चित आहे. विशेषत: आपली सामाजिक कौशल्ये या साथीमुळे काहीशी पुसट झाली आहेत आणि समाजात मिसळण्याचे नवीन नियमही पूर्णप्रमाणे आत्मसात झालेले नाहीत. त्यामुळे, कोरोनापूर्वी सामाजिक चिंतेचा अनुभव नसणाऱ्या व्यक्तींनाही सध्या ती भेडसावत आहे. व्यक्तीच्या नकारात्मक स्व-आकलनामुळे सामाजिक चिंता उद्भवू शकत. सामाजिक संकेतांनुसार वर्तन न होण्याची भीतीही याला कारणीभूत ठरते. जगभरात एकूण लोकसंख्येपैकी तब्बल १३ टक्के व्यक्तींना सामाजिक चिंतेच्या विकाराचा त्रास होतो. कोरोनानंतर त्यात मोठ्या प्रमाणात वाढ होईल असे बोलले जाते. त्याला अशा संशोधनातून पुष्टी मिळते.
लसीकरण झाले तरी अद्याप कोरोनाचा धोका कमी झालेला नाही. त्यामुळे पुढील काही वर्षे तरी अजून मास्कचा वापर करावाच लागेल असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ सांगतात. मास्कच्या वापराने कोरोनाला दूर ठेवणे शक्य आहे हे आता वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झाले आहे. पण मास्क वापरल्याने वर उल्लेखलेले सामाजिक परिणाम घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचाही विचार आपल्याला प्राधान्याने करावा लागणार आहे. कारण माणूस हा शेवटी समाजप्रिय प्राणीच आहे. त्यामुळे त्याच्या जीवनात सामाजिक वर्तनाला अनन्यसाधारण असे महत्व असते.