विज्ञान रोज नवनवीन कमाल करून दाखवित असते. आता हेच पहा ना, जे आता जगात नाहीत त्यांच्यासोबत बोलल्याचा भास करून देणारे चॅटबॉट मायक्रोसॉफ्टने तयार केले आहे. गेल्या महिन्यातच कंपनीने त्याचे पेटंट घेतले आहे. ही कल्पना अमेरिकेतील प्रसिद्ध टीव्ही मालिका ब्लॅक मिररमधून सुचली आहे. यात मुख्य भूमिकेतील मुलगी तिच्या मृत प्रियकरासोबत त्याच्या सोशल मीडिया अकाउंटमधून घेतलेल्या माहितीच्या आधारे बोलत असते. जर तुम्हाला दिवंगत प्रसिद्ध गायक मुकेश, मोहंमद रफी, किशोर कुमार यांच्यासोबत संगीतावर चर्चा करायची असेल किंवा तुम्हाला स्वर्गीय आजीकडून सल्ला घ्यायचा असेल तर हे चॅटबॉटद्वारे सैद्धांतिक आधारे शक्य होईल. Science Destinations: Chatbots that pretend to talk to people who are no longer in the world
या तंत्रज्ञानाच्या पेटंट दस्तऐवजानुसार ज्या दिवंगत व्यक्तीसोबत तुम्हाला बोलायचे असेल किंवा सल्ला घ्यायचा असेल त्याच्याशी संबंधित सर्व सोशल डेटा म्हणजे छायाचित्र, सोशल मीडिया पोस्ट, मेसेजेस, व्हॉइस डेटा किंवा त्यांनी लिहिलेली पत्रे याद्वारे चॅटबॉट त्यांचे व्यक्तिमत्त्व स्वीकारेल आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांना त्यांच्या पद्धतीने उत्तर देईल. यातून तुम्हाला त्या व्यक्तीसोबत बोलत असल्याचे जाणवेल. चॅटबॉटची भाषाशैली, आवाजातील चढ-उतार आणि संवेदनाही अशा असतील की तुम्हाला त्या दिवंगत व्यक्तीसोबत असल्याचा भास होईल. तसेच चॅटबॉटमध्ये काही टूल्सचा वापर करून दिवंगत व्यक्तींचे २-डी आणि ३-डी इमेजसह फेशियल रिकग्निशन अल्गोरिदमचा वापर करून जिवंत चित्रही तुम्ही बनवू शकता. यातून तुम्हाला थेट त्यांच्याशी जोडले गेल्याचे जाणवेल. यातून आपल्याला वेगळ्याचा विश्वात गेल्याची अनूभूती मात्र मिळणार आहे. त्यामुळे विज्ञानाच्या जगतात येत्या काळात काय घडू शकेल याची कल्पनाच न केलेली बरी. यातून अनेक नवनव्या बाबी घडणार आहेत.