महाराष्ट्रात तयार झालेले जोडे मारणारे दोन “नवे डिकास्टा” अजून थांबायलाच तयार नाहीत…!! काल 15 फेब्रुवारी 2022 ला पहिल्यांदा एका “डिकास्टाने” शिवसेना भवनात या पत्रकार परिषदेत जोडे मारण्याची भाषा केली. सिंहासन मधल्या डिकास्टाने (सतीश दुभाषी) अर्थमंत्री विश्वासराव दाभाडे (डॉ. श्रीराम लागू) यांना कामगारांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर सचिवालय समोर जोड्याने मारण्याचा इशारा दिला होता… तो तेव्हा काही प्रत्यक्षात आला नाही…!! त्याला आता 30 – 35 वर्षे उलटून गेलीत. Sanjay Raut v/s Kirit Somaiya : Two “Dicasta” shoppers hitting “Oral” shoes … !!
पण काल दुसऱ्या “डिकास्टानेे” शिवसेना भवनातून तिसऱ्याच माणसाला जोड्याने मारण्याचा इशारा दिला. त्यात त्याने स्वतःबरोबर त्यांनी शिवसैनिकांनाही सामावून घेतले. अर्थात हा इशारा काही लगेच अमलात यायचा नाही. पण त्या इशाऱ्यावर आज 16 फेब्रुवारी 2022 ला तिसऱ्या “डिकास्टाने” राजधानी नवी दिल्लीत भर पत्रकार परिषदेत हातात जोडे घेऊन मला जोडे मारण्याची भाषा करता??, मग 19 बंगल्यांचे मालमत्ता कर भरणाऱ्यांना कोणत्या जोड्याने मारणार?? असा सवाल दुसऱ्या “डिकास्टाला” केला.
एकूण महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झालेले हे “तोंडी जोडे मारा” आंदोलन थांबायला काही तयार नाही…!! ते हातात जोडे घेऊन प्रत्यक्षात काही अमलात येत नाही, पण निदान एकमेकांना तोंडी इशारा देत तरी हे दोन्ही “डिकास्टा” महाराष्ट्राच्या राजकारणातला “जोडे मारा” अध्याय पुढे लिहीत चालल्याचे दिसत आहे. आता हा अध्याय नेमका किती वेळ चालेल हे सांगता येत नाही, पण निदान मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपर्यंत नक्कीच या “जोडे मारा आंदोलनाचे” “तोंडी पडसाद” आपल्याला ऐकायला आणि पाहायला मिळतील…!! मराठी माध्यमांनी तर यादी “डिकास्टांचे” कॉन्ट्रॅक्टच घेतले आहे…!! त्यामुळे लगे रहोच काय… पण बढे रहो मुन्नाभाई…!!