संघ कसा आहे ? तर संघ संघा सारखा आहे ! असे म्हंटले जाते . संघाची तुलना अन्य संघटनांशी करून किंवा त्याची नक्कल करून कुणालाही संघ आकलन होत नाही. संघात गुरुदक्षिणा ज्याला म्हटले जाते त्यात आणि सभासद वार्षिक वर्गणी यात मूलभूत फरक काय ? स्वयंसेवक आणि सभासद यात मूलभूत आणि नेमका फरक काय? संघात कुठल्याही स्वयंसेवकाला कारणे दाखवा नोटीस नसते. कुणाचे निलंबन नसते. प्रचलित सामाजिक संघटना चालवताना जे शब्द वापरले जातात आणि ज्या प्रक्रिया घडतात त्या अमलात न आणता हे संघटन ९६ वर्ष अखंड वाटचाल करत आहे . या दीर्घ प्रवासात संघाचे दोन संघ झाले नाही. RSS pracharak, 200 rupees & Shared pawar
असाच संघात एक शब्द प्रयोग आहे तो म्हणजे संघ प्रचारक ! जो शब्द प्रयोग खरे तर शब्द प्रयोग नाही ती एक मनस्थिती आहे. या मनस्थिती ची काही लक्षणे आहेत. सर्व प्रथम मी माझा नाही ही अवस्था! एकदा मी माझा नाही म्हणजे मग माझे काहीच नाही . परिवार नाही, कुटुंब नाही त्या मुळे कुणी विशिष्ट नातेवाईक नाही तर समाजच आपला . वैयक्तिक सुख , दुःख नाही. जे समाजाचे तेच आणि तेव्हढेच आपले !’ सुख दुःखें समे कृतवा ‘ या अवस्थेत स्थितप्रज्ञा सारखे जगायचे . संघ सांगेल तेथे जाऊन कांम करायचे. श्वेत वस्त्र परिधान करायचे आणि समाजात राहून संन्यस्त वृत्ती ठेवायची !
समाजात जो पूर्ण वेळ कार्यकर्ता किंवा पेड worker हे शब्द प्रयोग वापरले जातात , बऱ्याच वेळा त्या कल्पनेतून प्रचारक या शब्दा कडे किंवा या व्यवस्थेकडे बघितले जाते पण येथेच गडबड होते आणि तीच गडबड आमच्या महाराष्ट्रातील ज्येष्ठ राजकीय नेतृत्व असलेल्या शरद पवार यांची झाली असावी.
कारण आज काल सोशल मीडियात एक पोस्ट नागालँड येथे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या संदर्भात त्यांनी केलेल्या उल्लेखा मुळे गाजते आहे. वरकरणी ती भलावण करणारी असली तरी त्यातून या प्रचारक व्यवस्थेमागील उदात्त भावना थोडी दुर्लक्षित होत आहे. मुळात या मुलाखतीत विचारलेला प्रश्न राजकीय स्वरूपाचा आहे. भाजपची शक्ती कशा मुळे वाढते किंवा तत्सम प्रश्नाला उत्तर देताना नागालँड मध्ये भेटलेला संघ प्रचारकाचा विषय खरे तर अप्रस्तुत आहे.
संघाचा प्रचारक इतक्या दूरवर अपरिचित ठिकाणी, भाषा आणि खान पान पद्धतीतील वेगळेपणा सहन करत काम करतो ते राजकीय पक्षाच्या प्रचारासाठी नाही तर देशाची अविभाज्य अंग असलेल्या भूप्रदेशाला भारताशी जोडून ठेवून आपल्या मूळ सांस्कृतिक धरोवरात टिकवण्यासाठी. त्या कामाचा भाजपला फायदा होत असेल तर तो जी राजकीय भूमिका घेतो त्यामुळे. अन्य पक्षांनी भूमिका योग्य घेतली तर त्याना त्याचा फायदा होईल ! अर्थात पवार साहेबांच्या सारख्या धुरंदर नेत्याला हे चांगले माहीत आहे म्हणूनच आज त्यांचा वारसदार नातू नगर जिल्ह्यात त्याच्या मतदारसंघात सर्वात उंच भगवा ध्वज अभिमानाने फडकवताना दिसत आहे !
कुठल्याही राजकीय व्यवस्था बदल किंवा कुणाला मुख्यमंत्री अथवा पंतप्रधान होण्यासाठी मुळात ही एव्हढी मोठी पवित्र आणि उदात्त व्यवस्था उभी केलेली नाही. स्वतः पूजनीय डॉक्टर हेडगेवार ,पूजनीय गुरुजी ते अगदी आजचे सरसंघचालक पूजनीय मोहनजी यांचे व्यक्तिगत जीवन संघाच्या प्रचारक व्यवस्थे पुढे उदाहरण म्हणून राहिले आहे. एखादा कार्यकर्ता प्रचारक निघाला म्हणून त्याच्या कुटुंबाची अगदी २०० रुपयांची सुद्धा गरज संघाने पूर्ण करावी ही पण अपेक्षा प्रचारक मनात आणत नाही. त्याच्या प्रेरणा ह्या इतक्या सीमित नसतात. अर्थात असा प्रचारक गेलेल्या कार्यकर्त्यांच्या घरी स्थानिक कार्यकर्ते निश्चितच लक्ष देतात पण त्याचे स्वरूप आर्थिक नसते.
पवार साहेब हिंदू धर्मग्रंथावर किती विश्वास ठेवतात हे माहीत नाही, पण वेद हे ज्ञानाचे भांडार आहे याबद्दल जगातील सर्वांचे एकमत आहे हे निश्चित! असे हे वेद कुणी लिहले कुणालाच माहीत नाही म्हणून वेद लिहणारे अनामिक होते असे म्हंटले जाते! त्याच धर्तीवर संघ कार्याची कल्पना पूजनीय डॉक्टर हेडगेवार यांनी केली आणि अनामिक राहून सहज स्वाभाविक देशासाठी जीवन जगावे याच, प्रेरणेतून प्रचारक व्यवस्था निर्माण झाली .
घरात अत्यंत गरिबी, उच्च शिक्षण घेऊन मुलगा चांगले दिवस आणेल या आशेवर असताना एकुलता एक मुलगा प्रचारक जातो. हे स्वीकारणे आजच्या काळात खूप अवघड आहे पण अशा अनेक घरात परवानगी घेण्यासाठी किंवा नंतर पण त्या घरी गेल्यावर तेथील त्या आई वडिलांचे मोठे मन बघितले की मन थक्क होऊन जाते. सतत राजकीय विचार करणारे नेते आणि नकारात्मक प्रेरणेतून पत्रकारितेचा व्यवसाय करणाऱ्यांना या प्रेरणा, या भावना किती समजतील हा मोठा प्रश्नच आहे !
सुरुवातीच्या काळात असा निघालेल्या उच्च शिक्षित तरुण प्रचारकाला मोबाईलसुद्धा वापरता येत नाही, सायकल किंवा पायी पण त्याला प्रवास करावा लागतो आणि त्याला घरी जायचे असेल तर परवानगी घ्यावी लागते. ऊस तोडणी कामगार, शेतकरी, कामगार घरातून तरुण मुले प्रचारक जात आहेत. त्यामुळे ही उदात्त प्रेरणा मध्यमवर्गीय वर्गापुरती आता मर्यादित राहिलेली नाही. नागालँड तर खूप दूर. खुद्द पवार साहेबांच्या बारामतीत ग्रामीण भागातून असे तरुण प्रचारक काम करण्यासठी पुढे येत आहे. बारामती ग्रामीण भागातून अनेक तरुण घरच्या विपन्न अवस्थेला न जुमानता संघप्रचारक
म्हणून झोकून देऊन काम करत आहेत. या सर्वांचा जवळून परिचय करून घेतला , थोडी आत्मीयतेने चौकशी केली तरी २०० रुपये मानधनाची संकल्पना स्पष्ट होईल असे वाटते.
एक नक्की पवार साहेबांनी आपल्या वैचारिक विरोधक असणाऱ्यांची चांगली बाजू स्वीकारली; पण त्यात २०० रुपयांच्या उल्लेखाने नेहमी प्रमाणे त्यांच्या हेतूबद्दल शंका निर्माण झाली !नेहमी प्रमाणे ते कौतुक करतात का उपमर्द करतात, असा गोंधळ होण्यासारखी जी त्यांची शैली आहे त्या मुळे संभ्रम निर्माण होतो अर्थात त्यात त्यांचा दोष नाही ! पण आम्ही त्यांचा हेतू प्रामाणिक आहे हे गृहीत धरून अशी अपेक्षा धरतो की संघ परिचयाचे हे पाऊल त्यांनी अजून प्रामाणिक पणे पुढे न्यावे , म्हणजे महाराष्ट्राच्या ते हिताचे होईल अन्यथा राजकीय कुरघोड्यात महाराष्ट्र कधी नव्हे इतका जातीय ,प्रादेशिक अस्मितेच्या डबक्यात गटांगळ्या खातो आहे तो अधिक रसातळाला जाईल आणि मग पुन्हा त्याला छत्रपतींच्या स्वप्नातला महाराष्ट्र उभा करण्यासाठी महाराष्ट्रातील तरुणाला पुन्हा कंबर कसावी लागण्याची वेळ येईल! तेव्हा देर से आये, फिर भी दुरुस्त नही आये । असे होण्यापेक्षा देर से आये, लेकिन दुरुस्त आये ! असे केव्हाही चांगले.
RSS pracharak, 200 rupees & Shared pawar
महत्त्वाच्या बातम्या
- शशी थरुरना गाढव म्हटल्याबद्दल तेलंगण काँग्रेस प्रदेशाध्यक्षाकडून माफी
- काश्मिरी पंडितांचे काश्मीर खोऱ्यात पुनर्वसन करण्यासाठी मोदी सरकारचे महत्त्वाचे पाऊल
- लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली चार धाम यात्रा आजपासून सुरु
- India Vaccination : कोरोना लसीकरणात भारताने मोडला चीनचा ऐतिहासिक विक्रम, रात्री साडे नऊपर्यंत 2.25 कोटी डोस दिले