आपण शिकल्यामुळे अनेक गोष्टींचे आपल्याला आकलन होते. पण आकलन होताना नेमक्या कुठल्या क्रिया आपल्या मेंदूत घडतात याचा उलगडा करताना या जाणून घेण्यामुळे म्हणजेच आकलन प्रक्रियेदरम्यान काही जैवरासयिनिक प्रक्रिया घडतात का, याचा शोध घेण्याचं काम सध्या जगातील अनेक जण करीत आहेत. त्यातील महत्वाचे नाव म्हणजे इंग्लंडमधील एडिंबरा विद्यापीठातील शास्त्रज्ञ मॉरिस. Researchers have discovered the secret behind the creation of memorabilia
आठवणी मेंदूत साठविल्या जाताना त्या घटनेशी निगडीत दृकश्राव्य माहिती मेंदूत साठविली जाते व ती कायमस्वरूपी तसंच जीवनभरासाठी आपल्या मेंदूत साठविली जाते, असा निष्कर्ष मॉरिस यांनी काढला तो प्रचंड संशोधनाअंतीच. तसेच ब्रिस्टॉल विद्यापीठात संशोधन केलेल्या प्रा. ग्रॅहॅम कॉलिनग्रीज या संशोधकाने स्मरणप्रक्रियेत मज्जापेशीतील बंध घट्ट होत असताना त्यात एनएमडीए या प्रथिनरूपी विशिष्ट रासायनिक रेणूंचा सहभाग असल्याचं सिद्ध करून दाखविलं आहे. या रासायनिक रेणूंचा सहभागात दोन मज्जापेशीदरम्यान आढणाऱ्या सोडियम पोटॅशियम रेणूंचाही महत्त्वाचा वाटा असल्याचं सिद्ध करण्यात आलं. मेंदूतील गुंतागुंतीच्या स्मरणप्रक्रियेत रसायनांचा सहभाग असल्याचं सिद्ध करणारं संशोधन करण्याची प्रेरणा ब्लिस व लोमो यांच्या मज्जापेशीवरील मूळ मूलभूत संशोधनातून मिळाली असल्याचं नमूद करत या संशोधनामुळे मानवी स्मरणशक्तीचं कोडं उलगडण्यात यश आल्याचं मत कॉलिनग्रीज यांनी व्यक्त केलं आहे.
मेंदूतील स्मरणकोष साठविण्यासाठी मज्जापेशी तसेच मज्जापेशीतील बंध निर्माण होण्यासाठी लागणाऱ्या रसायनांची एकत्रित प्रक्रिया काय असते, याचं स्पष्टीकरण मॉरिस यांनी सादर करून स्मरणकोषांच्या साठवणीचं कोडं उलगडून दाखवलं आहे. या सर्व शास्त्रज्ञांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे मेंदूतील स्मरणकोषांच्या निर्मितीचे रहस्य स्पष्ट होण्यात मदत झाली आहे. त्याचबरोबर मानवजातीस शाप ठरणाऱ्या ऑटिझम, स्किझोफ्रोनिया, ताण, नैराश्य तसेच एपिलेप्सी यासारख्या विकारांवर प्रभावी उपाय करता येणं आता शक्य होणार आहे.