कोरोनाच्या वर्षभराच्या कालखंडात प्रत्येकाला रोख पैशाचे महत्व जाणवले असेल. ज्यांच्याकडे रोख गंगाजळी उत्तम असते त्यांना फारशा अडचणी जाणवत नाहीत. उद्योगव्यवसायासाठी रोख स्वरूपातील पैशाचे जेवढे महत्व असते तेवढेच प्रत्येक व्यक्तीच्या आर्थिक नियोजनातही असते.Recognize the importance of cash in daily life
ज्यावेळी आपल्या उत्पन्नावर मर्यादा येतात तेव्हा अशा रोख रकमेचे महत्व अधिक वाढते. आपल्या एकूण खर्चांपैकी काही खर्च रोखीनेच द्यावे लागतात आणि त्यासाठी अशी रक्कम रोख स्वरूपात किंवा बचत खात्यात असणे अत्यावश्यक असते. असे खर्च करण्यासाठी दीर्घकालीन गुंतवणुकीचा फारसा उपयोग होत नाही कारण ती रोख स्वरूपात नसते.
उदाहरणार्थ जमिनीतील गुंतवणूक दीर्घकाळात फायद्याची ठरते मात्र अल्प काळातील खर्च देण्यासाठी त्या फायद्याचा लगेच उपयोग होत नाही. याशिवाय औषध-उपचारांसाठी करावे खर्च, आपत्कालीन येणारे खर्च यासारख्या इतर खर्चांसाठी देखील आपल्याकडे पुरेशी रक्कम रोख स्वरूपात असणे आवश्यक असते.
आपल्याकडे रोख रक्कम ठेवावी की अशी रक्कम चांगला परतावा देणाऱ्या पर्यायात गुंतवावी या प्रश्नाचे उत्तर व्यक्तिसापेक्ष असले तरी काही ठोकताळे वापरून याचे उत्तर शोधता येते. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला त्याच्या मालमत्तेचा कर दहा हजार रुपये भरायचा आहे. दिलेल्या मुदतीत तो कर भरला नाही तर त्याला पाचशे रुपये दंड भरून पुढील दोन महिन्यापर्यंत असा कर भरणे शक्य आहे .
अशा व्यक्तीने स्वतःकडे रोख रक्कम न ठेवता ती रक्कम तीन महिने मुदतीच्या पर्यायात गुंतवली आहे ज्यावर त्याला एकूण सातशे रुपयांचा खात्रीशीर परतावा मिळणार आहे. या व्यक्तीने दंड भरूनही कर दिला तरी त्याला फायदा होईल कारण दंडाची रक्कम पाचशे रुपये आहे आणि गुंतवणुकीवर मिळणार परतावा त्यापेक्षा अधिक म्हणजे सातशे रुपये आहे.
थोडक्यात रोख रक्कम न ठेवल्यामुळे होणारा तोटा आणि इतर पर्यायांतून होणारा फायदा याचा तुलना करून असा निर्णय घेता येतो. अर्थात हा नियम प्रत्येक खर्चासाठी लावता येत नाही. अचानक उदभवणाऱ्या आपत्कालीन खर्चासाठी रोख रक्कमच लागते. त्यामुळे प्रत्येक वेळी परताव्याचा विचार न करता ठरविक रक्कम रोख स्वरूपात असणे गरजेचे असते.
Recognize the importance of cash in daily life