रासायनिक खते, कीटकनाशके, तणनाशके यांच्या सहवासात नियमित वावरणाऱ्या व्यक्तींमध्ये कर्करोग आणि पार्किन्सनची शक्यता जास्त आढळते असे एका संशोधनात स्पष्ट झाले आहे. अमेरिकेमधील माँटेना विद्यापीठातील संशोधकांनी मेक्सिको शहरामधील १८६ रुग्णांच्या मेंदूचे विच्छेदन करून काढलेले निष्कर्ष धक्कादायक आहेत. Polluted air and Parkinson’s ..
त्यांना यामधील ९९ टक्के रुग्णांच्या ब्रेन स्टेम मध्ये हवेतील अति सूक्ष्म प्रदूषके मोठ्या प्रमाणावर आढळली. त्यामध्ये धातू अधातुचे कण जास्त होते. संशोधन पुढे सांगते की या प्रदूषकानी मेंदूच्या या भागांमधील पेशींच्या ऊर्जा निर्मितीला नष्ट करून मज्जातंतूंची हानी तर केलीच पण त्याचबरोबर हानिकारक प्रथिन निर्मितीत भागही घेतला.
ही प्रथिने अल्झायमरला कारणीभूत असणाऱ्या दोन विशिष्ट प्रथिनांशी विशेष साम्य दर्शवतात. या संशोधनात सहभागी सर्व रुग्ण शहराच्या घनदाट वस्तीमधील प्रदूषित भागात राहत होते आणि यामध्ये शाळकरी मुले आणि तरुणांचा सहभाग जास्त होता. हवा प्रदुषित नसलेल्या रूग्णांच्या मेंदुपेशीत अशी प्रदूषके त्यांना आढळली नाहीत. मेंदूत आढळलेल्या प्रदूषकांचा वेगळा अभ्यास शास्त्रज्ञानी केला तेव्हा त्याना दिसून आले की, हे सर्व धातू आणि अधातूचे कण वाहतुकीची कोंडी, खनिज तेलाचे ज्वलन आणि चाकांच्या जमिनीलगतच्या घर्षणातून तयार झाले आहेत.
यावरून असा निष्कर्ष निघाला की अल्झायमरची प्रथिने मेंदूमध्ये प्रदूषित हवेमुळे तरुण वयातच निर्माण होतात मात्र त्यांचे खरे कार्य वयोपरत्वे सुरू होते. हवेमधील अति सूक्ष्म कणांमध्ये फक्त धूळच नसते तर धातू अधातूंचे कणही असतात. अशी प्रदूषित हवा श्वासोश्वासाबरोबर फुफ्फुसात व तेथून रक्तामध्ये मिसळते. तसेच हे घातक कण अन्नाबरोबर पचनसंस्थेत व तेथून रक्तात आणि रक्ताभिसरणातून ब्रेन स्टेममध्ये जाऊन साठवले जातात. अजूनही पार्किन्सन कसा होतो हे समजलेले नाही, पण या संशोधनामुळे आता नवीन दिशा मिळाली आहे. आपण कुठे राहतो, प्रदूषित हवेला किती सामोरे जातो, श्वास कसा घेतो, कोणते अन्न कोठे खातो, प्रवास कसा करतो यावर तुमचे भविष्यामधील आरोग्य अवलंबून आहे.