• Download App
    राजकीय विवेकभ्रष्टांचे संकेतभंग...!! political non - wisdom of arvind kejriwal, nitin gadkari, subramanyam swami

    राजकीय विवेकभ्रष्टांचे संकेतभंग…!!

    राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय संकेत, प्रोटोकॉल्स तोडून मुख्यमंत्र्यांनी बोलावेच कशाला… आपल्याच सरकारचे महत्त्वाचे निर्णय माहिती नसणे हे ज्येष्ठ केंद्रीय मंत्र्याला शोभादायक आहे काय… हे प्रश्न विचारले गेले पाहिजेत. त्यांची उत्तरे ते देणार नसले, तरी विवेकवाद्यांनी त्यावर चर्चा घडविली पाहिजे. political non – wisdom of arvind kejriwal, nitin gadkari, subramanyam swami


    सारा देश कोरोना विरोधात निकराची लढाई लढत असताना आणि माणसे किड्या मुंग्यांच्या मौतीने मरत असताना राजकीय विवेकभ्रष्टांच्या मर्कटलीलांना ऊत आला आहे. आतापर्यंत काँग्रेसमधून फक्त राहुल गांधीच पप्पूगिरी करून देशवासीयांची करमणूक करीत होते. पण आता त्यांच्या जोडीला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल देखील येऊन बसले आहेत.

    मध्यंतरी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बैठकीत प्रोटोकॉल तोडून लाइव्ह प्रक्षेपण केले. त्यावरून मोदींनी त्यांना समज दिली होती. पण “आधी होत्या वाघ्या… त्याचा झाला पाग्या… मूळ स्वभाव जाई ना… त्याचा येळकोट राहीना…!!” असे केजरीवालांचे झाले आहे. त्यांनी ऐन कोरोना काळात सिंगापूरची खोडी काढली आहे. त्यामुळे त्यांच्या स्वतःच्या प्रतिमेबरोबरच भारताच्या प्रतिमेलाही धक्का बसला आहे.

    मध्यंतरी सुब्रह्मण्यम स्वामींनी काही लुडबुडी लीला करून झाल्या. त्यात नितीन गडकरींना कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष करण्याची आगाऊपणाची सूचना होती. पण तो मुद्दा निदान देशांतर्गत तरी होता आणि त्याला मोदी – स्वामी वादाची जूनी किनार होती. शिवाय स्वामी हे कोणत्याही घटनात्मक पदावर नाहीत आणि ते unguided missile असल्याने ते कुठेही घुसू शकते. ते त्या वेळी गडकरींमार्गे मोदींवर कोसळले होते इतकेच. अर्थात त्याने मोदींचे नुकसान काहीच झाले नाही. पण स्वामींच्या आगाऊपणाच्या सूचनेनंतर काही दिवस लोटल्यानंतर गडकरी अडचणीत आल्याचे आज पाहायला मिळाले. यूट्यूबवर भाषणे करून महिन्याला ४ लाख रूपये कमविणाऱ्या गडकरींना आपल्याच केंद्र सरकारने घेतलेल्या लस उत्पादनाच्या महत्त्वाच्या निर्णयाची माहिती नव्हती. ती त्यांना नंतर करवून घ्यावी लागली आणि खुलासा करावा लागला, यातच त्यांच्या राजकीय मुत्सद्देगिरीचा “दर्जा” कळला.



    पण दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचा विषय वेगळा आहे. त्यांनी एका राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर बसून दुसऱ्या देशाचा अधिक्षेप केला आहे. मुख्यमंत्री कोणत्या वेळी, कोठे, काय बोलतो, काय वागतो याला महत्त्व आहे. तरीही केजरीवालांनी ताळतंत्र सोडून सिंगापूर या देशासंबंधी आगळीक करणारे विधान केले. कोरोनाच्या एका व्हेरिएंटला “सिंगापूर स्ट्रेन” असे संबोधले. आपल्या असल्या विधानातून आंतरराष्ट्रीय पातळीवर त्या देशाचा अधिक्षेप होतो, याचे भानही केजरीवालांना राहिलेले नाही.

    केजरीवाल हे पूर्वाश्रमीचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय संकेतांची आणि प्रोटोकॉल्सची पुरती माहिती आहे. तरीही त्यांनी कोरोनासारख्या संवेदनशील मुद्द्यावरून सिंगापूरसारख्या प्रगत देशाला आणि भारताच्या अग्नेय आशियतल्या महत्त्वाच्या सहयोगी सहकाऱ्याला टोचावे हे आंतरराष्ट्रीय संकेतांमध्ये बसणारे नाहीच.

    शेवटी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना हस्तक्षेप करावा लागला. सिंगापूरच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा करावी लागली. ही चर्चा आंतरराष्ट्रीय संकेतांनुसार उच्च दर्जाच्या भाषेत झाली असली, तरी सिंगापूरची नाराजी त्या चर्चेत स्पष्ट झाली. केजरीवालांचा विषय आला. एक प्रकारे ही भारतासाठी आंतरराष्ट्रीय कुंचबणा ठरली. केजरीवालांचे विधान हे bad political taste चे उदाहरण ठरले.

    जयशंकर यांना केजरीवालांचे विधान ही भारताची भूमिका नाही, हे सांगावे लागले. हा सगळा घटनाक्रम केजरीवालांसाठी वैयक्तिक पातळीवर कसाही असला तरी तो भारतातल्या एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यासाठी नक्कीच शोभादायक नाही. राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय संकेत – प्रोटोकॉल्स डावलून मुख्यमंत्र्याने बोलणे आणि वागणे अजिबात अपेक्षित नाही. त्याने देशाच्या प्रतिमेवर परिणाम होतो. याचे भान केजरीवालांसारख्या आयएएस अधिकारी राहिलेल्या मुख्यमंत्र्याला असू नये, याचे वैषम्य वाटले पाहिजे. त्यांनी आपल्या मर्कटलीला थांबविल्या पाहिजेत.

    political non – wisdom of arvind kejriwal, nitin gadkari, subramanyam swami

    Related posts

    Thackeray -Pawar : ऐक्य + बैठकांच्या कोरड्या बातम्या; प्रत्यक्षात भाजप प्रणित सरकारला धक्का लावता येत नसल्याच्या निराशा!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!

    पवार काका – पुतणे आतून एकत्र, फक्त मतभेदांच्या नाटकाचे रचलेय नेपथ्य!!